no images were found
कौशल्य विकास विभागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – मंगलप्रभात लोढा
मुंबई : तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्रालय दालन येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आढावा घेतला.
कौशल्य रोजगार विभागाअंतर्गत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संस्थांमध्ये योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री श्री. लोढा यांनी केल्या. त्याचबरोबर रोजगार आयुक्तालय अंतर्गत तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे स्वरूप, राज्यात आयोजित करावयाचे एकूण मेळाव्याची संख्या, आगामी तीन महिन्यात घ्यावयाच्या मेळाव्याचे नियोजन., महास्वयं पोर्टलची सद्यस्थिती, सन २०२४-२५ मध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजनासाठी
करावयाची पूर्व तयारी, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील प्रवेश, कोर्सेस वाढविण्याबाबत केलेले नियोजन., स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रबोधिनी, विद्या विहार येथील कोर्सेस, बॅचेस, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत अकॅडमी तर पाच महसुली विभागात कार्यान्वित करणे,२ जुलै रोजी कौशल्य दिंडीचे आयोजन करणे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ,सुकाणू समिती स्थापनेबाबतची सद्यःस्थिती याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आढावा घेतला.
या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी शर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे उपायुक्त डी. डी. पवार यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.