no images were found
शंभर कोटी रस्त्यांचा आप ने केला पंचनामा; गटार चॅनेल गायब
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत शहरातील सोळा रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आला. या निधीतून पाच रस्त्यांचे काम सुरु होते. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. यावर आम आदमी पार्टीने हे काम अपूर्ण असल्याचे सांगत रस्त्याचा पंचनामा करण्याचा इशारा दिला होता.
आप चे पदाधिकारी पोहचल्यानंतर फक्त शाखा अभियंता सुरेश पाटील तेथे होते. तुमचे काय ते निवेदन द्या, आम्ही वरिष्ठाना कळवू असे बोलताच आप पदाधिकारी आक्रमक झाले. तुम्हाला पत्र दिले असताना वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार, क्वालिटी कंट्रोल व डिझाईन कन्सलटंट अनुपस्थित का असा सवाल करत, आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी संबंधित अधिकारी न आल्यास फावडा कुदळ घेऊन रस्त्याचे सॅम्पल महापालिकेत घेऊन जाण्याचा इशारा दिला. पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना बोलावून घेतले.
यानंतर आप पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. रस्त्याच्या सर्व तपासण्यांचा अहवाल मागितल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले. अजून अहवाल उपलब्ध नाही, उपलब्ध करून देतो अशी उत्तरे दिली. रोड क्रॉस सेक्शन प्रमाणे काम का केले नाही, एस्टीमेट मध्ये गटार चॅनेल पडदी नमूद असताना प्रत्यक्षात गटार का गायब आहे, रस्ता आधी आणि चॅनेल नंतर असे बांधकाम केल्यास रस्त्याची लेव्हल बिघडून रस्ता खराब झाल्यास अधिकारी जबादारी घेणार का असा सवाल देसाई यांनी केला. रस्त्याचे सर्व अहवाल व कोअर काढण्याची मागणी त्यांनी केली.
यावर शहर अभियंता सरनोबत यांनी रस्ते करण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी राहिले असल्यास त्या सुधारू, गुरुवारी संयुक्त पाहणी करून कोअर काढून घेतो असे आश्वासन दिले. तसेच रस्ते कामाच्या संबंधित सर्व कन्सलटंट यांची शनिवारी बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीत सर्व अहवाल सोबत घेऊन यावेत अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा देसाई यांनी दिला.
यावेळी उपशहर अभियंता आर के पाटील, शाखा अभियंता सुरेश पाटील, आप शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मयुर भोसले, प्राजक्ता डाफळे, दुष्यंत माने, डॉ. कुमाजी पाटील, रवींद्र राऊत, राजेश खांडके, संजय नलवडे, शुभंकर व्हटकर, रमेश कोळी, अमरसिंह दळवी, गणेश मोरे, दिलीप पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.