no images were found
सर्वोच्च न्यायालयात ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याकरिता 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 रोजी ‘विशेष लोकअदालत-2024’ सप्ताहाचे आयोजन केले आहे. प्रलंबित प्रकरणे लोक न्यायालयामध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. या प्रकरणामधील पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नोटिसा बजावल्या आहेत. पक्षकारांनी विशेष सप्ताहामध्ये प्रकरणात संमती फॉर्म भरुन द्यावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा के. बी. अग्रवाल यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात लोकअदालीतचे आयोजन केले असून जिल्ह्यातील काही प्रकरणे ही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी काही प्रकरणे लोकन्यायालयामध्ये निकाली काढण्याकरिता त्यांची यादी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्याकडे देवून ती जिल्ह्यातील तालुका कोर्ट, तालुका बार, जिल्हा न्यायालय, कोल्हापूर व जिल्हा बार यांच्या नोटीस बोर्डावर प्रकाशित करण्यात आली आहेत.
नोटीस मिळाल्यानंतर, त्या सूचीबद्ध प्रकरणांमधील संबंधित पक्षकारांनी विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडीने प्रकरण मिटविण्यासाठी संमती फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे. पक्षकार किंवा त्यांच्या वकिलांनी त्यांचे संमती फॉर्म त्यांचे संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्त्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावी. विशेष लोकन्यायालयापूर्वी त्यांच्या तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकिलांना दिली जाईल. पक्षकार अथवा वकिल बैठकीला प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या लिंकवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहू शकतात, अशी माहितीही श्रीमती अग्रवाल यांनी दिली आहे.