
no images were found
उपमुख्यमंत्री पद हे मला द्यावे लागणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी ते घेतले नाही :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
कोल्हापूर :- देवेंद्र फडणवीस हे २०१८ मध्येच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. पण ते एकनाथ शिंदे यांना द्यावे लागणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी ते घेतले नाही असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला.
भाजप-शिवसेना युती २०१४ ला होऊ शकली नाही कारण आपल्या लोकांना विश्वास नव्हता. आपण कसे वागतोय याचे आत्मपरीक्षण करायला हवे. मुंबई महापालिका निकालावेळी भाजपचा महापौर करण्याची तयारी झाली होती. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, की पण आमच्या नेत्याचा जीव महापालिकेत आहे. शिवसेनेला बिनविरोध द्या. माझ्या एका शब्दावर त्यांनी मुंबई महापालिका शिवसेनेला दिली व महापौर निवड बिनविरोध केली परंतू त्यांनी त्याची कुठेही वाच्यता केली नाही.
आपली युती स्वार्थासाठी नव्हे, वैचारिक आहे. ही आपली भावनिक युती आहे. ज्यांना बाळेसाहेबांनी दूर ठेवले त्यांच्याबरोबर तुम्ही खुर्चीसाठी युती केली. आज निधी मागितला की केंद्रातून पैसे दिले जातात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे पाठबळ मोठे आहे.
बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी रक्त सांडले आहे. घरावर तुलशीपत्र ठेवून तुम्ही हजारो केसीस अंगावर घेतल्या म्हणून शिवसेना वाढली आहे. त्यामुळे सत्तेसाठी तडजोड करणार नाही असे शिंदे यांनी बजावले.
राज्यात २०१९ च्या सत्तास्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनुकूल भूमिका घेतली होती, त्यासाठी तुम्हांला ५० कॉल केले परंतू तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही हा कद्रूपणा ही तर तुमची झूटनीती होती असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
हा एकनाथ शिंदे घरात बसणारा नाही. नालेसफाईची पाहणी करणारा, जमिनीवरचा मुख्यमंत्री आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.