no images were found
येत्या काळात 750 मधपाळ तयार करण्याचे उद्दिष्ट :- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर :- मध उद्योगाच्या माध्यमातून पाटगावसह आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नाबार्डच्या सहकार्यातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात येत आहे. या ‘पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनी’ च्या माध्यमातून पाटगावसह आजूबाजूच्या गावांचा मध निर्मिती प्रक्रिया व विक्री उद्योगात समावेश होणार असून हे काम येत्या महिन्याभरात सुरु होण्यासाठी पाटगावच्या मधाचे ब्रँडींग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटींगसाठी आवश्यक ती सर्व तयारी गतीने पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
‘मधाचे गाव पाटगाव’ कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी अडसुळ, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी तसेच संबंधित अधिकारी, सरपंच, मध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनी’ च्या माध्यमातून खादी व ग्रामोद्योग विभाग व आरसेटीच्या वतीने अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण द्या. प्रशिक्षण घेवून तयार होणाऱ्या मधपाळांनी किमान 5 मधपेट्या घेवून मध उद्योग सुरु करण्यासाठी बँका व विकास संस्थानी आवश्यक तो कर्ज पुरवठा करा.
पाटगाव, शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत सर्व गावांतील प्रत्येक घरांतील किमान एक सदस्य मधपाळ होण्यासाठी प्रयत्न करा. येत्या 3 वर्षात कमीत कमी 750 मधपाळ व मधुसखी तयार करण्याचे उद्दीष्ठ ठेवून त्या दृष्टीने प्रशिक्षण देवून मधपाळ तयार करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, येथील पर्यटन स्थळांच्या मार्गावर माहितीफलक लावणे, न्याहारी व निवासाची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह आदी सुविधा द्याव्यात. पाटगाव मध्ये तयार होणाऱ्या हनी पार्क (मध उद्यान) व माहिती दालनामध्ये मधाचे सर्वांगीण महत्व, मधुमक्षिका पालन, यातून होणारा लाभ आदीं बाबतची माहिती द्यावी. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी नियोजन करावे. याठिकाणी सुरु करण्यात येणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळे येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध मध उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.
यामुळे अधिकाधिक नागरिकांनी मधाचे गाव पाटगावला भेट द्यावी, असे आवाहन करुन मध उद्योग करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.