no images were found
टेंबलाई मंदिर परिसर सुशोभीकरणाचा डीपीआर तयार करा : श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर :- कोल्हापुरातील नवदुर्गा मंदिरापैकी प्रमुख असणाऱ्या श्री टेंबलाई मंदिर परिसर गेली अनेक वर्षे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिला आहे. नवरात्रोत्सवासह वर्षभर या ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देत असतात. परंतु, याठिकाणी असणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्याने भाविकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. भाविकांच्या मुलभूत गरजा ओळखून श्री टेंबलाई मंदिर परिसर सुशोभीकरणाचा डीपीआर तयार करा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
त्र्यंबोली यात्रेनिमित्त श्री टेंबलाई देवीची आरती राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडली. यानंतर अधिकाऱ्यांच्या समवेत राजेश क्षीरसागर यांनी श्री टेंबलाई मंदिर परिसराची पाहणी केली.
यावेळी अधिकाऱ्यांना सूचना देताना राजेश क्षीरसागर यांनी, मंदिर परिसरात महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधावीत. परिसरातील रस्ते सुसज्ज करण्यात यावेत. मंदिर परिसरात संरक्षक भिंत बांधण्यात यावी. यासह येणाऱ्या भाविकांच्या विरंगुळ्यासाठी उद्यान विकसित करण्यात यावे. पहिल्या टप्प्यातील सुशोभिकरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती पर्यटन लेखाशिर्ष मधून रु.५ कोटी निधीची तरतूद करू. याकरिता आवश्यक श्री टेंबलाई मंदिर परिसर सुशोभीकरणाचा डी.पी.आर. तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात यावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.आर.पाटील, उप- अभियंता महेश कांजर आदी उपस्थित होते.