
no images were found
शिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवरायांना मानाचा मुजरा
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच 6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन. या शुभ दिनाचे औचित्य साधून शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी जिल्हा परिषद आवारातील कोरगावकर वाड्याच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते उभारण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वराज्य गुढीची विधीवत पूजा करून त्याची उभारणी सनई, पोवाड्याच्या जयघोषात करण्यात आली. गुढी उभारणी नंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले. जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत मधे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत गाथा महाराष्ट्राची कार्यक्रमातून शिवरायांच्या जीवनपटाला उजाळा देण्यात आला. कोरगावकर वाड्याच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमासाठी अतिरीक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, मनिषा देषाई यांच्यासह जिल्हा परिषदेतील खातेप्रमुख, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून कोरगावकर हाऊसच्या प्रांगणात शिवप्रतिमेचे पूजन, कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाहिरी, ही माय भूमी, शिवगाथा, गोंधळी नृत्य, बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रसंग, शूर आम्ही सरदार, मराठी पाऊल पडते पुढे आणि शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे सादरीकरण यातून सर्व परिसर शिवमय झाला. ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या सागर चौगुले यांनी शिवाजी महाराजांची भूमिका या कार्यक्रमातून साकारली. अतिशय उत्साहात, जोमाने सादर केलेल्या विविध प्रसंगांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. एक तास चाललेल्या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील विविध प्रसंग नृत्य व नाटिकेतून सादर करून शिवराज्याभिषेक दिनी त्यांच्या कर्तुत्वाला उजाळा देण्यात आला.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचं आत्मभान जागं केलं. जनतेच्या मनातलं आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता केला. रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला, अशा या राज्याचा शिवराज्याभिषेक सोहळा दिव्य स्वरूपात मंचावर उभा करून या कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देषाई यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले.