
no images were found
धैर्यशील माने यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता ?
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अटीतटीच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र खासदार धैर्यशील माने यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांचा 14723 मताधिक्यांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा निवडून येत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास सार्थ ठरवत खासदारकी पटकावली. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांचे 15 व्या फेरीपर्यंत असलेले मताधिक्य पिछाडीवर पाडत 24व्या फेरीअखेर 14723 मतांनी त्यांनी हा विजय मिळविला.
या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तिसऱ्या स्थानी राहिले. सत्यजित पाटील निवडून येतील असा राजकीय अंदाज बांधला जात होता तशी चर्चाही चौदाव्या फेरीपर्यंत होती परंतु उमेदवारी मिळवण्यापासून ते लढविण्यापर्यंत खडतर असा प्रवास करणाऱ्या धैर्यशील माने यांनी पंधराव्या फेरीपासून मुसंडी मारत आघाडी घेत ती विजयापर्यंत शेवटपर्यंत राखली. पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे एकमेव प्रतिनिधी म्हणून धैर्यशील माने विजयी झाले आहेत. मुख्यमंत्री या मतदारसंघात तीन दिवस तळ ठोकून कार्यकर्ते व नेते यांच्याशी संवाद साधत होते, त्याचाच फायदा माने यांना झाला परंतु, महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारलेले शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना मात्र प्रचंड मतांनी पराभव पत्करावा लागला आहे. या प्रभावामुळे शेट्टी यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्याचे चर्चा सर्वत्र होत आहे. एकनाथ शिंदे गटाचे कट्टर समर्थक असलेले खासदार देशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनाचा फायदा माने यांना झाला.