no images were found
दिव्याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
पुणे :- बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट पुणे व पुणे डिस्ट्रिक्ट चे सर्कल आयोजित केलेल्या एच 2 ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय मानांकित जयसिंगपूरच्या (कोल्हापूर) दिव्या पाटील ने साडेसहा गुणासह सरस टायब्रेक गुण आधारे उपविजेतेपद पटकाविले..तिला रोख तेरा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.अंतिम आठव्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित जळगावच्या भाग्यश्री पाटील विरुद्ध कोल्हापूरच्या दिव्या पाटील यांच्यातील सेमिस्लाव्ह पद्धतीने सुरु झालेल्या डावात 19 चालीनंतर दोघींनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला..त्यामुळे अग्रमानांकित जळगावची भाग्यश्री पाटील साडेसात गुणासह निर्विवादपणे अजिंक्य ठरली तर कोल्हापूरच्या दिव्या पाटील ने साडेसहा गुण व सरस टायब्रेक गुणामुळे उपविजेतेपद मिळविले.दुसऱ्या पटावर द्वितीय मानांकित पुण्याचे अनुष्का कुतवल व आठवी मानांकित छत्रपती संभाजी नगरची सानी देशपांडे दोघींचाही डाव बरोबरीत सुटल्यामुळे,साडेसहा गुणासह अनुष्काला तृतीय स्थान मिळाले तर सानीला चौथे स्थान प्राप्त झाले..भाग्यश्री पाटील (जळगाव) दिव्या पाटील (कोल्हापूर) अनुष्का कुतवल (पुणे) व सानी देशपांडे (औरंगाबाद) या चौघींची तामिळनाडू मध्ये 30 जून ते 10 जुलै दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली या चौघी राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.या स्पर्धेमध्ये पहिल्या दहा विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस देण्यात आली…यामध्ये दिव्याची जुळी बहीण दिशा पाटीलला सहा गुणासह पाचवे स्थान मिळाले व दिशाला रोख सात हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.दिव्या व दिशा पाटील या दोघी बहिणी जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूर येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत आहेत.त्यांना शाळेचे मुख्याध्यापिका स्मिता पाटील मॅडम व क्रीडा शिक्षक राहुल सरडे सर यांचे चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले व सचिव मनीष मारुलकर,आई कविता पाटील व वडील शरद पाटील या सर्वांचे प्रोत्साहन लाभले.बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून सुरुवातीचे रोहित पोळ सर नंतर उत्कर्ष लोमटे सर व सध्याचे सुमुख गायकवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले.