no images were found
मतमोजणी केंद्रातील सुरक्षाविषयक सुविधांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा
कोल्हापूर : ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे दि.४ जून रोजी सकाळी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक सर्व सुविधांची तयारी प्रशासनाकडून पुर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी आयोगाच्या सुचनांनूसार निश्चित केलेल्या आणि ओळखपत्र वितरीत केलेल्या अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश असणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. याचा आढावा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी त्या त्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेतला. यामध्ये सीसीटीव्ही, बॅरीगेट, आत येण्याचा व बाहेर जाण्याचे मार्ग, सुरक्षा जाळी, ईव्हीएम मतमोजणी केंद्रात नेण्याचा मार्ग, गेटवरील व अंतर्गत पोलीस सुरक्षा, माध्यम कक्ष आदी ठिकाणी त्यांनी भेट देवून कामांची माहिती घेतली व आवश्यक सूचना केल्या. यावेळी त्यांनी उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, कुलर व्यवस्था, संगणक व्यवस्था आदी विषयांबाबत पाहणी करून कामाबाबत आढावा घेतला.
निवडणुकीचा निकाल शांततेत व वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून मंगळवारी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी साठी ३४९ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त १० टक्के कर्मचारी राखीव असणार आहेत. ६०० पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहेत. यासर्व यंत्रणेला बसण्यासाठी जागा, पाण्याची, अल्पोपहार, भोजन, स्वच्छतागृह आदी सुविधा देण्यात येणार आहेत.
४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या ठिकाणी येण्यासाठी तीन ठिकाणी आत येण्यासाठी गेट उपलब्ध असणार आहेत. क्रमांक १ गेटमधून अधिकारी व मतमोजणी कर्मचारी आत येतील. दोन क्रमांकाच्या गेटमधून उमेदवार प्रतिनिधी तर शेवटच्या गेट मधून माध्यम प्रतिनिधींना आत सोडले जाणार आहे. याअनुषंगाने त्या त्या ठिकाणी आत आल्यावर मोबाईल फोन जमा करून घेतले जाणार आहेत. माध्यम प्रतिनिधींचे फोन माध्यम कक्षात ठेवले जाणार आहेत. मतमोजणीच्या कक्षात आयोगाकडे नावे कळविलेले अधिकारी सोडून इतर कोणालाही मोबाईल फोन नेहता येणार नाहित. प्रत्येक मतमोजणी केंद्रात, आत येण्याच्या व जाण्याच्या मार्गावर तसेच बाहेर सीसीटीव्ही मधून सुरक्षाविषयक पाहणी केली जाणार आहे. निवडणूक निरीक्षक मतमोजणी साठी उद्या जिल्हयात दाखल होणार आहेत.