no images were found
“मी साकारत असलेल्या बानीप्रमाणेच मी सुद्धा खूप महत्त्वाकांक्षी आहे”
सोनी सबवरील ‘बादल पे पांव है’ मालिका लवकरच सुरू होणार आहे. यातील बानीच्या साध्या पण सळसळत्या विश्वाकडे प्रेक्षक नक्कीच आकृष्ट होतील. बानीची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे अभिनेत्री अमनदीप सिद्धू. रवी दुबे आणि सरगुन मेहता द्वारा दिग्दर्शित ही मालिका पंजाबच्या पार्श्वभूमीवर बेतलेली असून यामध्ये बानी या तरुण आणि कष्टाळू, चुणचुणीत मुलीची कहाणी सांगितली आहे. आयुष्याने तिच्यावर जी बंधने लादली आहेत, ती तिला मान्य नाहीत.
मालिका सुरू होण्याअगोदर अमनदीपने मालिकेचे आगळेवेगळे कथानक, चंदीगडमध्ये शूटिंग करण्याचा अनुभव, बानीसारखी अनोखी भूमिका साकारण्यासाठी तिने केलेली तयारी याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याचा हा अंश –
- तू बानी या आपल्या व्यक्तिरेखेविषयी आम्हाला काय सांगशील?
बानी खरोखर अनोखी मुलगी आहे. ती एका छोट्या शहरात राहणारी मुलगी आहे, पण मर्यादित साधनांसह जगणे तिला मंजूर नाही. तिला मनापासून वाटते की, आयुष्याने जरी तिला मर्यादित संसाधने दिली असली, तरी त्या तुटपुंज्या साधनांत आयुष्य कंठायचेकी त्यापुढचा शोध घ्यायचा यातून पर्याय तिला निवडायचा आहे. आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन अधिक साधन-संपन्न करणे हे केवळ तिच्या हातात आहे. आपले नशीब स्वतः घडवण्यावर आणि आपल्या जीवनाची कहाणी आपणच लिहिण्यावर तिचा विश्वास आहे. बानीची ही स्वभाववैशिष्ट्ये पाहून मी अगदी सुरुवातीलाच तिच्या प्रेमात पडले. शिवाय, बानी मला बरीचशी माझ्यासारखीच वाटते. ती भावनाप्रधान आहे आणि माझ्याप्रमाणेच स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करणारी आहे.
- ‘बादल पे पांव है’मालिकेतील कोणती गोष्ट तुला भावली आणि बानीची भूमिका करण्यास तू होकार दिलास? इतर व्यक्तिरेखांपेक्षा बानी ही व्यक्तिरेखा कशी वेगळी आहे?
कधीही हार न माणण्याच्या बानीच्या वृत्तीने मला ‘बादल पे पांव है’ मालिकेकडे आकृष्ट केले. बानीचा हा स्वभाव माझ्यासारखाच आहे. बानीप्रमाणेच मी देखील खूप महत्त्वाकांक्षी आहे. ही महत्त्वाकांक्षा केवळ माझ्यापुरती नाही, तर माझ्या कुटुंबासाठीही आहे. आपल्या कुटुंबासाठी काहीही करण्याचा बानीचा स्वभाव इतर व्यक्तिरेखांपेक्षा तिला सरस ठरवतो. आयुष्याने ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्या नाकारणारी बानी एक प्रेरणादायक व्यक्तिरेखा आहे.
- एक अभिनेत्री म्हणून बानीची व्यक्तिरेखा साकारताना तुला कोणत्या अडचणी आल्याआणि या भूमिकेसाठी तू कशी तयारी केलीस?
बानी ही माझ्या वाट्याला आजवर आलेल्या भूमिकांपैकी एक अत्यंत आव्हानात्मक भूमिका आहे. ती अशा कुटुंबात जन्मली आहे, जेथे अत्यंत तुटपुंजी आर्थिक संसाधने आहेत. तिने आपल्या कुटुंबाला आयुष्यात नेहमी झगडताना पाहिले आहे. कष्ट करून आणि आशावादी दृष्टिकोन ठेवून आपल्या कुटुंबाच्या समस्या दूर करण्याची जबाबदारी तिने आपल्या माथी घेतली आहे. ती स्वतः लोभी नाही, पण आपल्या कुटुंबाला चांगले आयुष्य द्यावे ही तिची इच्छा आहे. कष्ट आणि चिकाटी या गुणांनी आपल्या कुटुंबाचे भागधेय बदलता येईल, असा तिचा विश्वास आहे. बानी साकारण्यासाठी मला सतत शिकण्याची आणि नवीन शोध घेण्याची गरज होती. तिची विचारसरणी आणि कधीही हताश न होण्याची वृत्ती अंगिकारणे हा एक प्रेरणादायक अनुभव होता. बानी साकार करताना मला मजा येत आहे आणि मला आशा आहे की, प्रेक्षकांना देखील पडद्यावर बानीला भेटून आनंद वाटेल!
- ही पंजाबमधली कहाणी आहे. तू स्वतः पंजाबची असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथानकातील पात्रे तुला अधिक जवळची वाटत आहेत का?
मी स्वतः सरदारनी असल्यामुळे, पंजाबच्या पार्श्वभूमीवरील कहाणी करायला मिळणे हा माझ्यासाठी बोनस आहे. लकबी, बोलण्याचा ढंग, भाषेतील बारकावे माझ्यासाठी स्वाभाविक आणि सहज आहेत. ही संस्कृती माझ्या परिचयाची आहे. या परिचयामुळेच मला वाटते, यातील कथानक आणि व्यक्तिरेखा यांच्याशी मी सहज संलग्न होऊ शकले.
- चंदीगडमध्ये शूटिंग करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
खरं सांगायचं तर चंदीगडमध्ये जाऊन शूटिंग करण्याबाबत मी जरा साशंक होते. हे माझ्यासाठी मोठे आव्हान असणार होते, पण हा नवीन अनुभव घेण्याची माझी तयारी होती. गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून आम्ही येथे शूटिंग करत आहोत. आणि हा फारच छान अनुभव होता. या प्रांताचा अस्सल अनुभव देण्यासाठी आम्ही खऱ्याखुऱ्या लोकेशन्सवर आणि शेतांमध्ये दृश्ये चित्रित केली आहेत. या स्थानांवर शूटिंग करताना खरोखर फार मजा आली.
- या मालिकेच्या प्रोमोमध्ये आम्ही बानीला स्टॉक मार्केटच्या विश्वात प्रवेश करताना बघत आहोत. कथानकातील या भागाकडून प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे?
सध्या त्याबाबत मी जास्त काही सांगू शकणार नाही. मी इतकेच सांगीन की, सर्वसामान्यपणे स्टॉक मार्केटचे विश्व पुरुषांशी निगडीत असते, पण या मालिकेत आपली नायिका या विश्वात आली आहे आणि येथील आव्हांनांना ती तोंड देणार आहे.
- रवी दुबे आणि सरगुन मेहता या जबरदस्त जोडीने निर्मिलेल्या मालिकेत काम करताना कसे वाटते आहे?
रवीदुबे आणि सरगुन मेहता या जबरदस्त जोडीने निर्मिलेल्या मालिकेत काम करताना फार आनंद होत आहे. ते जितके चांगले निर्माते आहेत, तितकेच उत्तम अभिनेते देखील आहेत. मी पहिल्यापासून त्यांच्या कामाची प्रशंसक आहे. त्यांच्या मागे मोठा अनुभव आहे आणि त्याचा फायदा मालिकेला मिळतो. निर्मितीचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांचे विचार फार मौलिक असतात. त्यांच्यासोबत या मालिकेत काम करताना दररोज काही तरी नवीन शिकायला मिळत आहे.
- शेवटी, या मालिकेविषयी तू प्रेक्षकांना काय संदेश देशील? ‘बादल पे पांव है’ ही मालिका त्यांनी का बघितली पाहिजे?
‘बादल पे पांव है’ ही फक्त एक मालिका नाही; तो एक अनुभव आहे, ज्यात आकांक्षा आहेत, संघर्ष आहे आणि बानीसारख्या सामान्य मुलीच्या विजयाची ही कहाणी आहे, जिच्यात मोठी स्वप्नं बघण्याची धमक आहे. या कहाणीत सर्व प्रतिकूलतांवर मात करून स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की, त्यांनी जीवनात चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी धडपडणाऱ्या बानीची हीभावनाप्रधान कहाणी उलगडताना अवश्य बघावी.