no images were found
महाराष्ट्रात रस्त्यावरील राजकीय संघर्षाचा पायंडा घालू नका!
‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे ठाकरे-शिंदे यांना आवाहन
मुंबई : पुरोगामी महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि निकोप अशा वैचारिक राजकीय स्पर्धेचा वारसा लाभला आहेे. पंरतु, गेल्या काळात घडलेल्या काही राजकीय घटनांमुळे राज्यात चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेत उभी फुट पडल्याने आगामी दसरा मेळावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रस्त्यावरील राजकीय संघर्ष पेटण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्तासंघर्षांच्या हा चुकीचा पायंडा राज्यात घालू नका, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे.
दोन्ही नेते त्यांच्या वर्तनातून हिंदुत्वावादी शिवसेना संपवण्यासाठी निघाले आहेत, असा दावा देखील पाटील यांनी केला. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकाच विचाराचे आहेत. हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे दोघेही खंदे समर्थक असून त्यांची वैचारिक भूमिका गतिमान करणारे आहेत. पंरतु, शिवसेनेतील ‘शिंदे बंडा’मुळे या दोघांमध्ये आलेल्या वितुष्टीमुळे पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. आता सभा आणि प्रतीसभा घेत एकमेकांचे उणेदुणे काढत, आरोप-प्रत्यारोप करीत हे नेते केवळ जनतेचे मनोरंजन करीत आहेत.
दोन्ही नेत्यांचे जनतेमधील प्रतिमा बरीच मोठी आणि आदरयुक्त आहे. अशात नळावरच्या भांडणाप्रमाणे न भांडता जनमानसातील आपली प्रतिमा कायम ठेवा, असे आवाहन पाटील यांनी केले. या नेत्यांचा एकमेकांविरोधातील आक्रामकपणा असाच सुरू राहीला तर उद्या दोन्ही गटांमध्ये रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे. महाराष्ट्र राजकीय दृष्टया अत्यंत शांत आहे. त्यामुळे राज्यात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश सारखी राजकीय हिंसाचाराची संस्कृती रुढ होवू नये; यामुळे या नेत्यांनी समजुतदारपणा दाखवावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगले कामे करून दाखवावी. उद्धव ठाकरे यांनी महानगर पालिका शिवेसेनेच्या ताब्यात राहावी यासाठी समाजपयोगी कार्य करावे. लोकांना चिथावणी देवून काही साध्य होणार नाही. समजस्याने काम करावे. अनेक वर्ष एकमेकांसोबत सत्ता उपभोगायची आणि आता लोकांसमोर ‘स्टंटबाजी’ योग्य नसल्याचे पाटील म्हणाले. राज्यातील जनतेला एवढा टोकाचा संघर्ष नको असल्याची भावना देखील पाटील यांनी व्यक्त केली.