no images were found
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि.९ : यंदाच्या शैक्षणिक सत्रात इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलीजी, बरगढ, ओडिशा येथील तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम व व्दितीय वर्षासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले असून इच्छूक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज १० जूनपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) साठी १३ जागा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी १ जागा राखीव आहेत. तसेच वेंकटगिरीसाठी २ जागा तसेच द्वितीय वर्षासाठी ३ जागांपैकी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी १ जागा राखीव असून प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज १० जूनपर्यंत मागविण्यात आले आहेत.
त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज १० जूनपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी कळविले आहे.