no images were found
कोल्हापुरातील ‘सार्वजनिक बांधकाम’च्या ४५० कोटींच्या कामांना ‘ब्रेक’
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल साडेचारशे कोटी, तर जलसंधारण विभागाची ६० कोटी अशी दोन्ही विभागांची जिल्ह्यातील तब्बल ५१० कोटी रुपयांची कामे रखडली आहेत. या कामांना स्थगितीचा अडथळा अद्यापही कायम आहे. त्यामुळे या विभागाचे अधिकारी स्थगिती उठण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सुमारे ५१० कोटी रुपयांची कामे रखडल्याने सिंचनांच्या आणि रस्ते विकासाच्या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जलसंधारण विभागातर्फे पाझर तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारणीची कामे केली जातात. महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील अशा कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाची कोट्यवधी रुपयांची कामे रखडल्याने जिल्ह्यातील रस्ते, इमारतींच्या कामांना ब्रेक लागला आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होतात. पावसाळ्यात अशा कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, डीटीपी तयार करणे अशी कामे होत असतात. मात्र, कामांना स्थगिती असल्याने कोणत्या कामांचे अंदाजपत्रक करावे, डीटीपी करावे या विवंचनेत अधिकारी, कर्मचारी आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीची १२५कोटी, तर रस्त्यांची ३२५कोटी रुपयांची कामे रखडली आहेत.
या आदेशामुळे जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलाव आणि पाझर तलावांची १८ कोटी रुपयांची कामे थांबली आहेत, तर २४ कोटी रुपयांची इतर कामे स्थगित झाली आहेत. एकूण ६० कोटी रुपयांची कामे रखडल्याने जलसंधारणाच्या कामांवर परिणाम झाला आहे.