no images were found
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दिलीप पटेलची भूमिका साकारण्याबद्दल जयेश मोरे म्हणतो
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिका पुष्पा (करुणा पांडे) या करारी, सकारात्मक आणि जीवनातील आव्हानांना हिंमतीने तोंड देणाऱ्या स्त्रीचा प्रवास उलगडून दाखवते. गेल्या काही भागांमध्ये प्रेक्षकांनी एक नाट्यमय घटना पाहिली. पुष्पाचे कुटुंब स्वरा (वृही कोडवारा)चा वाढदिवस एका रेस्टॉरंटमध्ये साजरा करत असताना दिलीप (जयेश मोरे) चा कट्टर शत्रू संतोष (अमित श्रीकांत सिंह) त्या रेस्टॉरंटला आग लावतो आणि दिलीप त्यात जळून मेला असा सर्वांचा समज होतो. घटनास्थळी पोलिसांना एक जळलेला मृतदेह सापडतो, ज्याच्या हातात दिलीपचे कडे असते. त्यावरून दिलीप त्या आगीत जळून मेला असा निष्कर्ष काढला जातो. परंतु, अलीकडे झालेल्या घडामोडीत हे सिद्ध झाले आहे की, संतोषचा बदला घेण्यासाठी दिलीपनेच आपण मेल्याचा दिखावा उभा केला होता.
मनमोकळ्या गप्पा मारताना जयेश मोरेने आपली व्यक्तिरेखा, पुढील कथानक, त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रवास आणि इतर अनेक विषयांबाबत सांगितले.
- ‘पुष्पा इम्पॉसिबल’मालिकेतील तुझ्या दिलीप पटेल या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळाला आहे?
मालिकेतील मोठ्या भागात दिलीप पटेल एका दुर्गुणी व्यक्तिरेखेच्या रूपात दिसला आहे, असे असूनही प्रेक्षकांना दिलीप पटेल खूप आवडला आहे. मी जिकडे जातो, तिथे दिलीपला खूप प्रेम मिळते. लोकांनी ही व्यक्तिरेखा डोक्यावर उचलून धरली आहे. मला या गोष्टीचे खरोखर आश्चर्य वाटते की, अनेक दुर्गुण असूनही या व्यक्तिरेखेला किती प्रेम मिळाले आहे!
- दिलीप पटेलच्या पुनरागमनामुळेअनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याने आपण मेल्याचा समज का पसरू दिला?
आपल्या कुटुंबाचे संतोषपासून रक्षण करण्यासाठी दिलीपला आपण मेल्याचा खोटा समज पासरवावा लागला. त्यांचे आणखीन नुकसान होऊ नये, यासाठी त्याने हा दिखावा केला. त्याच वेळी संतोषला मारून बदला घेण्याचा देखील त्याचा हेतू होता. अशा प्रकारे, मेल्याचे नाटक करून त्याने दोन गोष्टी साधल्या. एक तर आपल्या कुटुंबाचे रक्षण केले आणि बदला घेण्याचा मार्ग शोधला. दिलीपसाठी हा कठीण निर्णय होता. पण, त्याच्या मते, आपल्या कुटुंबियांच्या रक्षणासाठी त्याला तसे करणे भाग होते.
- दिलीप आपली मुलगी राशी हिच्यासाठी आपल्या संतापावर नियंत्रणठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. हा संघर्ष करत असताना तो आपल्या मुलीचा विश्वास जपू शकेल का?
भूतकाळात दिलीप आपले कुटुंब आणि मुलांना सोडून निघून गेला असला, तरी आता त्याला एक चांगला पिता व्हायचे आहे. मात्र कधी कधी त्याला आपला राग अनावर होतो आणि त्याचा निग्रह डळमळीत होतो. परंतु, राशीचा विश्वास कायमसाठी जिंकण्यास सगळे प्रयत्न करण्याची त्याची तयारी आहे. मला वाटते दिलीप मधला हा गुण त्याच्यातील मानवता दर्शवतो.
- आगामी कथानकात दिलीपकडून प्रेक्षकांना काय सर्प्राइज मिळणार आहेत?
मी ज्या ज्या वेळी सेट्सवर पुनरागमन केले आहे, तेव्हा मलाच नवे सर्प्राइज मिळाले आहे. या व्यक्तिरेखेच्या पुढच्या प्रवासात दिलीपचा सद्गुणी बनण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आणि दुसरीकडे त्याचा अनावर होणारा राग यातला लढा दिसेल. या क्षणी मी फार काही सांगू शकत नाही. पण मला खात्री आहे की, आगामी कथानकात निर्मात्यांनी दिलीपसाठी काही तरी रोचक योजून ठेवले असेल. प्रेक्षकांना दिलीप पटेल आवडतो आणि तो जेव्हा जेव्हा पुष्पाच्या आयुष्यात येतो, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना सर्प्राइज देतो. त्यामुळे, मला खात्री आहे की, यापुढे जे काही होईल, त्यामुळे प्रेक्षकांना आणखी एक सर्प्राइज मिळेल आणि कथानक अधिक रोचक होईल.
- करुणा पांडेशीतुझे कसे जुळते? तुम्हा दोघांचे सेटवरचे काही संस्मरणीय क्षण आहेत का?
करुणा आणि मी एकत्र असतो तेव्हा लहान मुलांसारखे असतो. आमची मैत्री शाळकरी मुलांच्या मैत्रीसारखी आहे. ज्यात अनेक निरागस आणि आनंदाचे क्षण आहेत. तिच्यासोबत काम करताना खूप मजा येते. 90 च्या दशकातील गाण्यांनी करुणा सगळ्यांना बांधून ठेवते आणि शूटिंगच्या मध्ये आम्हाला जेव्हा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा आम्ही एकत्र होऊन गाणी म्हणतो.