no images were found
वागले की दुनियाच्या सेट्सवर ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर आणि अपरा मेहताच्या मैत्रीचे रंग उधळले
मनोरंजन क्षेत्राचा काही दशकांचा अनुभव गाठीशी असलेल्या भारती आचरेकर आणि अपरा मेहता या दोन प्रसिद्ध अभिनेत्री सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत एकत्र दिसणार आहेत. राधिका वागलेची लहानपणीची मैत्रीण कादंबरीच्या रूपात अपरा मेहता अतिथी कलाकार म्हणून मालिकेत दिसणार आहे. ती व्यथित आहे आणि आपल्या मुलांकडून प्रेम मिळवण्यासाठी आसुसली आहे.
पडद्याच्या मागे मात्र अपरा मेहताच्या आगमनामुळे याच्या अगदी उलट वातावरण होते. या दोघी अभिनेत्री बऱ्याच काळापासून एकमेकींना ओळखत असल्यामुळे त्यांची मस्तच गट्टी जमली. त्यांचे ते सख्य पाहून संपूर्ण सेटवर वातावरण प्रसन्न होऊन गेले. त्या दोघी तर प्रचंड हसत होत्या आणि एकत्र दृश्ये चित्रित करताना त्यांना चेहरा निर्विकार ठेवणे कठीण जात होते. त्या दोघींमुळे सेटवर असलेला प्रत्येक जण त्या क्षणाचा आनंद अनुभवत होता. मैत्रीची ताकद आणि आपल्या समकालीन कलाकारांसोबत काम करण्याचा आनंद त्या दोघींच्या भेटीतून सगळ्यांना जाणवला.
या मालिकेत कादंबरी म्हणून अतिथी कलाकाराच्या रूपात दाखल होत असलेली अपरा मेहता म्हणते, “वागले की दुनियाच्या सेटवर आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखे वाटले. ही प्रॉडक्शन टीम फारच छान आहे. सुमीत आवडत्या मित्रासारखा आहे. मी या आधी त्याच्यासोबत काम केले आहे. अंजनजींच्या सोबत काम करताना देखील फारच मजा आली. भारतीजींशी माझा परिचय खूप जुना आहे. तिने खूप जिव्हाळ्याने माझे स्वागत केले. आमची एकत्र दृश्ये होती, त्यात आम्हाला प्रत्येक वेळी हसू फुटत होते. आमच्या संवादांशी आम्ही अडखळत होतो. आम्हाला चेहरा निर्विकार ठेवताच येत नव्हता. शूटिंग करायला खूप मजा आली आणि ‘वागले’मध्ये काम करताना घरी असल्यासारखे वाटले.”
राधिका वागलेची भूमिका करणारी भारती आचरेकर म्हणते, “आमच्या मालिकेत अपरा आल्यामुळे खूप मजा आली. मी बऱ्याच काळापसून तिला ओळखते. तिच्या प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे जिवाभावाची मैत्रीण भेटल्याचा आनंद मला उपभोगता आला. आमच्यात स्वाभाविकपणेच छान ताळमेळ आहे. पण शूटिंग करत असताना आम्हाला सारखे हसू फुटत होते आणि संवाद म्हणणे जड जात होते! संपूर्ण दिवस सेटवर आम्हाला एक खूप छान अनुभव मिळाला.”