no images were found
लसीकरण वेग वाढवल्यामुळे लम्पी चर्मरोगाची साथ आटोक्यात
जनावरांच्या लम्पी चर्मरोगाचा देशासह राज्यात फैलाव वाढताना दिसून येत आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातही या रोगाने फैलाव केल्याचे दिसतेय. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात प्रथम या रोगाने बाधित जनावराची पहिली केस समोर आली होती. आता बाधितांचा आकडा ७१२ झाला असून तो वाढत असतानाच लसीकरणाचा वेग वाढवल्याने रोगमुक्तीदरही वाढत असल्याचे समोर येत आहे.
गेल्या २४ तासांमध्ये ३० गायींना लम्पी चर्मरोगाची लागण झाली आहे. एक बैलही गेल्या २४ तासांमध्ये बाधित झाला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने शिरकाव केल्यापासून बाधित गायींची संख्या ५९५ वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे बाधित बैलांची संख्या ११७ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित पशुधनाची संख्या ७१२ वर जाऊन पोहोचली आहे; अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये लम्पी चर्मरोगाची लागण होऊन ४ गायींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अब्दुलल्लाट आणि कोडोलीमध्ये प्रत्येकी दोन गायींचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये २१ गायी आणि १२ बैलांचा मृत्यू झाल्याने पशुधन शेतकऱ्यांवर आघात आहे. दरम्यान बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असले, तरी लसीकरणाचा वेग वाढवल्याने रोगमुक्ती दर३२.३ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे पशुधन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मृत्यू दर ४.६३ टक्के असून बाधित दर ०.२५ टक्के आहे.
पशुधनांमधील लम्पी चर्मरोगच्या वाढत्या फैलावामुळे स्थानिक प्रशासनाकडून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी वेग देण्यात आला असून संपूर्ण कोल्हापूर शहरामधील भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३४६ गायींचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ हजार ५६१ बैलांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण लसीकरणाचा आकडा २ लाख २१ हजार ९०७ वर जाऊन पोहोचला आहे. कोल्हापूर शहरामध्ये १२९७ भटक्या व पाळीव गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये भटक्या १३३ जनावरांना लस देऊन त्यांना लाल रंगाचे निशाणही करण्यात आलेले आहे; अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.