no images were found
राजारामचे 1346 सभासद अपात्र : प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकारमंत्र्यांचा निर्णय
सतेज पाटील गटाची सरशी; महाडिकांना धक्का
कोल्हापूर : आज उच्च न्यायालयाने कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याचे कार्यक्षेत्राबाहेरील व बनावट एक हजार ३४६ सभासद अपात्र ठरविण्याचा निर्णय कायम ठेवला. प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकारमंत्र्यांचा या निर्णयाने माजी मंत्री सतेज पाटील गटाची सरशी तर कारखान्यातील सत्तारूढ माजी आमदार महादेवराव महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे कारखान्याच्या निवडणुकीचाही मार्ग सुकर झाला आहे.
‘राजाराम’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एक हजार ८९९ सभासदांच्या विरोधात कारखान्यातील विरोधी शाहू परिवर्तन आघाडीने हरकत घेतली होती. प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे यावर सुनावणी होऊन यातील ४८४ सभासद पात्र ठरविले होते. यासोबतच दुबार व मृत मिळून ६९, तर बनावट १००८ व कार्यक्षेत्राबाहेरील ३३८ असे एक हजार ३४६ सभासद अपात्र ठरविण्यात आले होते. हा निर्णय १४ फेब्रुवारी २०२० ला देण्यात आला होता. या निर्णयाविरोधात सत्तारूढ गटाने तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील केले होते; पण तेही फेटाळण्यात आल्यावर या निर्णयाविरोधात अपात्र सभासदांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
उच्च न्यायालयात दोन वर्षांपासून या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित होती. आज त्यावर न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने यापूर्वी प्रादेशिक साखर सहसंचालक व सहकारमंत्र्यांनी दिलेले आदेश कायम ठेवत अपात्र सभासदांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणी विरोधी परिवर्तन आघाडीतर्फे अॅड.रवी कदम, अॅड. पी. डी. दळवी व ॲड. केदार लाड आदींनी काम पाहिले.
गेल्या २८ वर्षांपासून कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. या निर्णयाने सतेज पाटील गटाला मात्र उभारी मिळाली असून महाडिक गट मागे राहिला आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे या निवडणुकीविषयी राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या निवडणुकीत थोडक्या मतात श्री. पाटील यांचे पॅनेल पराभूत झाले होते. कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे, यासाठी आम्ही लढा देत होतो. आजच्या निर्णयाने सभासदांना न्याय मिळाला. बाहेरच्या जिल्ह्यांतील सभासदांविरोधात स्थानिक सभासदांनी हा लढा उभारला होता, त्यालाही यश आले असे सतेज पाटील म्हणाले.