
no images were found
नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरें सभा घेणार ?
रत्नागिरी: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती.राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. अद्यापपर्यंत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकदाही महायुतीच्या व्यासपीठावर दिसलेले नाहीत. परंतु, लवकरच राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची पहिली सभा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते.
राज ठाकरे हे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरु शकतात, असे सांगितले जात आहे. 4 मे रोजी सिंधुदुर्गात राज ठाकरे यांची सभा होऊ शकते, अशी माहिती मनसे कार्यकर्त्यांकडून मिळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मनसेचे कार्यकर्ते अगोदरच नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. रत्नागिरीमध्ये नुकतीच मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सभा घेतली होती. त्यानंतर येत्या एक-दोन दिवसांमध्ये स्वत: राज ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेऊन येथील प्रचारात रंग भरु शकतात.
नवनिर्माण सेनेकडून रत्नागिरी- सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत उदय सामंत आणि नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची खंत बोलून दाखवली होती. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयेत, त्यामुळे त्यांची आठवण येते. राज ठाकरे यांचे आभार, मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. तर उदय सामंत यांनी राज ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुन ऐकण्याचा योग यावा, अशी इच्छा बोलून दाखवली होती.