
no images were found
BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची IPL 2023 संदर्भात घोषणा
आयपीएलचे स्वरूप पुढील वर्षीपासून पुन्हा बदलणार असल्याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. पुढील वर्षापासून म्हणजेच 2023 च्या सीझनपासून आयपीएल कोविड-19 पूर्वीच्या जुन्या फॉर्मेटमध्ये परत येणार आहे, ज्यामध्ये संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने खेळणार आहे. 2020 मध्ये यूएई, दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. 2021 मध्ये ही T20 स्पर्धा दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे ही लीग घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल.
याबाबत माहिती देताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, ‘आयपीएल पुढील वर्षापासून घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर सामने (होम-अवे) खेळण्याच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केले जाईल. सहभागी १० संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आपापले सामने खेळतील. बीसीसीआयने या संदर्भातील पत्र राज्य संघटनांना पाठवले आहे. 2020 नंतर प्रथमच BCCI आपला संपूर्ण देशांतर्गत हंगाम आयोजित करत आहे.’
महिला आयपीएलबाबतही गांगुली म्हणाले की, बीसीसीआय सध्या महिला आयपीएल आयोजित करण्यावर काम करत आहे. त्याचा पहिला हंगाम पुढील वर्षारंभीच आयोजित केला जाऊ शकतो. महिलांच्या IPL व्यतिरिक्त BCCI 15 वर्षांखालील मुलींची एकदिवसीय स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे.’ या स्पर्धा २६ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत बंगळुरू, रांची, राजकोट, इंदूर, रायपूर व पुणे येथे खेळल्या जातील अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.