no images were found
पंकजा मुंडेंची दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरु
मुंबई : शिवसेनेचा दरवर्षी उत्साहात पार पडणारा दसरा मेळावा यंदा मात्र परवानगीच्या प्रतीक्षेत खोळंबलेला आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर शिवेसेनेचा दसरा मेळावा पार पडतो मात्र यंदा महिना झाला तरीही मुंबई महानगरपालिकेकडून शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असं सांगत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्हीही गटांना मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज या विषयावर सुनावणी झाली. दोन्ही गटाचे मुद्दे ऐकून कोर्टाने उद्या पुन्हा सुनावणी होईल, असे निर्देश दिले आहेत. एकूणच दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे अविरत प्रयत्नात असताना दुसरीकडे सावरगावमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मेळाव्याच्या तयारीसंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या समर्थकांना खास आवाहन केले आहे.
‘कोरोनामुळे अधुरे राहिलेले भगवानगडाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्या दिवसाच्या प्रतिक्षेत… तो दिवस आपला.. एक अनोखा दिवस… कोणता दिवस, कोणते स्थळ, आणि निमित्त काय??? तुम्हाला तर माहितीच आहे…लागा तयारीला, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भक्तीगडावरील अपूर्ण राहिलेल्या कामांना गती दिल्याचा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या समर्थकांना मेळाव्याच्या तयारीसाठी आव्हानात्मक संदेश दिला.