no images were found
७ ऑक्टोबरपासून प्रो-कबड्डी सामने रंगणार
मुंबई : प्रो-कबड्डी लीगच्या आगामी मोसमाचे बिगुल वाजले असून बंगळूरमधील श्री कांतीरवा इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्या सत्राची सुरुवात होईल. त्यानंतर २७ ऑक्टोबरपासून पुणे, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या लीगचे सामने होतील. यासंदर्भातील घोषणा बुधवारी या स्पर्धेचे संयोजक मशाल स्पोर्टस् यांच्याकडून करण्यात आली आहे. या प्रो-कबड्डी लीगचे सामने प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये जाऊन पाहण्याची संधी कबड्डीप्रेमींना उपलब्ध आहे. या स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवसांतच तिहेरी सामन्यांचा आनंद कबड्डीप्रेमींना घेता येईल. पहिल्या ६६ सामन्यांच्या वेळापत्रकामध्ये पहिल्या दोन दिवसांतच सर्व १२ संघ मैदानावर उतरणार आहेत. इतकेच नव्हे तर प्रो-कबड्डी लीगच्या साखळी फेरीत दर शुक्रवार व शनिवारी तीन-तीन सामन्यांची रंगत येईल. सलामीची लढत गतविजेता दबंग दिल्ली-यू मुंबा यांच्यामध्ये होणार असून त्याच दिवशी दुसरा सामना बंगळूर बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात होईल तसेच युपी योद्धाज-जयपूर पिंक पँथर्स यांच्यात तिसरा सामना होणार आहे. या स्पर्धेसाठीच्या तिकिटाचे बुकिंग www.prokabaddi.com या सांकेतिक स्थळावर करता येईल.