no images were found
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल महाविकास आघाडीत नाराजीचा सूर!
मुंबई : महाविकास आघाडीत जागा वाटप अंतिम झाले नसताना, तसेच ज्या जागांवर वाद आहेत, अशा जागांवरही उमेदवार जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंबद्दलशरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी महाविकास आघाडीची जागा वाटप आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेल येथे झाली. चार तास चाललेल्या या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार गटाकडून शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
सांगली आणि दक्षिण मुंबई या जागांवर काँग्रेसने दावा सांगितला असताना तसेच या जागांबाबत निर्णय झाला नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले आहेत. या संदर्भात बैठकीत शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने या जागांवरील दावा सोडलेला नसून हा विषय बैठकीत अनिर्णयीत राहिल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सांगलीच्या जागेचा निर्णय आता दिल्लीतूनच होईल, असेही सांगण्यात आले.
‘भिवंडी आमची आहे’भिवडीची जागा कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ‘भिवंडी आमची आहे, आमचीच राहणार’ असे ठाम विधान केले आहे. काही विषय प्रलंबित आहेत, एका दिवसात सर्व ४८ जागांचा प्रश्न सुटणार नाही, आमचा समन्वय सुरू आहे. जे प्रश्न सुटलेले नाहीत, त्याची चर्चा सुरू आहे. कुठल्याही जागेबद्दल मी बोलणार नाही.