Home Uncategorized मधुमेहाविरूध्द लढ्यात विविध संस्थांमध्ये सहयोगाची गरज – तज्ञ

मधुमेहाविरूध्द लढ्यात विविध संस्थांमध्ये सहयोगाची गरज – तज्ञ

10 second read
0
0
40

no images were found

मधुमेहाविरूध्द लढ्यात विविध संस्थांमध्ये सहयोगाची गरज – तज्ञ

पुणे  : मधुमेहाविरूध्द लढ्यात प्रगती करण्यासाठी विविध संस्थांमध्ये सहयोग आणि ज्ञानाचे आदान-प्रदान होणे गरजेचे आहे,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे ८ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे व “आयसर” पुणे चे संचालक प्रा. सुनील भागवत,विशेष अतिथी व “एएफएमसी” पुणे चे कमांडंट (ले.जन.) डॉ.नरेंद्र कोतवाल, ८ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२४ चे आश्रयदाता व चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाल चेलाराम, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चीफ एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ.उन्नीकृष्णन एजी, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. (ब्रिगेडियर) अनिल पंडित, चेलाराम समुहाचे उपाध्यक्ष प्रकाश  भूपटकर ,सौ.शोभना चेलाराम व इतर मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.याप्रसंगी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे चे एमेरिटस प्राध्यापक, डॉ. गुरुराज मुतालिक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन प्रगती आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांसह मधुमेहाचा एक महत्त्वाचा जोखीम घटक असणारा स्थूलपणा यावरील उपचारांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
एएफएमसी पुणेचे कमांडंट डॉ.नरेंद्र कोतवाल म्हणाले की,मधुमेहींची वाढती संख्या ही आपल्या आरोग्यसेवा प्रणालीसाठी एक मोठे आव्हान आहे,मात्र नवनवीन शोध आणि सहकार्याची संधी देखील आहे. मधुमेह ही केवळ वैद्यकीय स्थिती नव्हे तर व्यक्ती,कुटुंब आणि समुदायांवर परिणाम करणारे मोठे आव्हान आहे. मधुमेहाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर वाढणे ही बाब चिंताजनक आहे आणि या जागतिक आरोग्य संकटाला सामोरे जाण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.
आयसरचे संचालक प्रा.सुनिल भागवत म्हणाले की, मधुमेहासारख्या स्थितीसाठी जोखीमकारक ठरणारे अनेक घटक असतात. प्रत्येक व्यक्तीच्या स्थितीचे समाधान हे समान औषधाने होऊ शकत नाही. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय स्थिती आणि कारणीभूत घटकांच्या तपशीलावर सखोल अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे डेटा सायन्स,मशिन लर्निंग,आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क व तत्सम साधने उपयुक्त ठरू शकतील आणि इथेच डेटा सायंटिस्ट,बायोलॉजिस्ट आणि केमिस्ट हे जिथे एकत्र काम करतात अशा आयसरसारख्या संस्थेचा समाजाला उपयोग होऊ शकतो.याप्रसंगी बोलताना बी.जे.मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटल पुणे चे प्रोफेसर  एमेरिटस  डॉ.गुरूराज मुतालिक म्हणाले की, अनेक अत्याधुनिक शोध लागूनही मधुमेहापासून आपल्याला मुक्तता मिळाली नाही.मधुमेह हा केवळ साखर आणि चयापचयाचा आजार नाही,तर त्याहूनही त्याची व्याप्ती खूप खोल आहे.त्याचा संपूर्ण जीनोमवर (जनुकीय माहितीचा संच) होत असतो आणि त्यामुळे यंत्रणा बिघडते. जिनॉमिक्स आणि एपिजिनॉमिक्स या उदयोन्मुख विज्ञानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, मधुमेहावर विजय मिळविणे हे का अवघड आहे यावर या विज्ञानांनी प्रकाश टाकला आहे, मात्र आता आशा निर्माण झाली आहे. मेडिकल जिनॉमिक्स यामध्ये प्रगती होत आहे. गेल्या 15 वर्षात या विषयात काम करणार्‍या वैज्ञानिकांना 20 नोबेल पारितोषिके मिळाली आहेत. आपले वय जसे वाढत जाते तसे जुनी गुणसुत्रे तुटत जातात (क्रोमोझोनल अ‍ॅब्रेशन) आणि रोगप्रतिकारक प्रणाली खराब होते. तसेच यामुळे चयापचय प्रणालीवर परिणाम होतो. मधुमेहामध्ये कर्बोदकांशी संबंधित चयापचयच नाही तर चरबी आणि प्रथिनांशी निगडीत चयापचय गंभीरपणे विस्कळीत होतो. या सर्व बाबींवर काम करण्यासाठी खाजगी संस्थांसह विविध संस्थांमध्ये सहकार्याची गरज आहे. नॉन-कोडींग आरएनए क्षेत्रात पाश्‍चात्य देशांमध्येच प्रयोगशाळा असून अशा प्रयोगशाळा भारतात देखील सुरू व्हायला हव्यात.
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चीफ एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ.उन्नीकृष्णन एजी म्हणाले की, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट ही संस्था चेलाराम फाऊंडेशनच्या स्तंभांपैकी एक आहे,ज्याचे कार्य आरोग्य आणि वेलनेसच्या पलीकडे जाऊन इतर क्षेत्रातही विस्तारीत आहे. विज्ञानाच्या नवीन पध्दती समजून घेण्यासाठी व त्याचा उपयोग रूग्णांवर आणखी चांगले उपचार करण्यासाठी ही परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे.
लाल चेलाराम यांनी चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचा आजवरचा प्रवास आणि यशाबद्दल थोडक्यात माहिती दिली.ते म्हणाले की, रूग्णसेवा,प्रशिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून सकारात्मक परिणाम घडविण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू करण्यात आली.चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट चे मुख्य उद्धिष्ट हे मधुमेह असलेल्या लोकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी प्रयत्न करणे आहे . 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा कायलॅक भारतात अधिकृतरित्‍या लाँच

स्‍कोडा कायलॅक भारतात अधिकृतरित्‍या लाँच   कोल्हापूर : स्‍कोडा ऑ…