
no images were found
उद्धव ठाकरे यांनी घेतली शाहू महाराजांची भेट
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. दुपारी साडेतीन वाजता उद्धव ठाकरे यांचे नवीन राजवाड्यावर आगमन झाले. यावेळी ठाकरे व शाहू महाराजांची गळा भेट झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे उमेदवारी निश्चित मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळ्याच नेत्यांनी कंबर कसली आहे. शाहू महाराजांच्या उमेदवारीला बळ देण्यासाठी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यावेळी खासदार संजय राऊत तेजस ठाकरे आमदार वैभव नाईक, युवराज मालोजीराजे छत्रपती, ठाकरे गटाचे शिवसेनाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुजित विंचेकर आदी उपस्थित होते. ठाकरे आणि शाहू महाराजांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.