no images were found
इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु
कोल्हापूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त 1 मुलांचे व 1 मुलींचे शासकीय वसतिगृह नवीन सुरु होत आहे. वसतिगृहात सन 2024-25 या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) असून गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कोल्हापूर व संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकांकडे अर्ज भरुन सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक सचिन साळे यांनी केले आहे.
मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये इमाव, विजाभज, विमाप्र, दिव्यांग, अनाथ व आर्थिक मागास (EWS) प्रवर्गामधील इयत्ता 11 वी पासून पुढील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 70 टक्के जागा व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 30 टक्के जागेवर सन 2024-25 मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय व शासकीय वसतिगृहातून अर्ज विनामुल्य वितरीत करण्यात येत आहेत. तसेच प्रवेश अर्जासाठी क्युआरकोड व प्रवेश अर्जाची PDF आवश्यक त्यासर्वांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
वसतीगृह सुरु झाल्यानंतर वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन, DBT, कॉट, गादी, उशी, बेडशीट, मोफत शैक्षणिक साहित्य, सुविधा- टेबल, खुर्ची, कपाट इ. व दरमहा निर्वाह भत्ता तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सर्व सोयी-सुविधा प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य पुरविण्यात येतील. नवीन सुरु होत असलेल्या वसतिगृहात इमाव-51, विजाभज-33, विमाप्र-6, दिव्यांग-4, अनाथ-2 व आर्थिक मागास प्रवर्ग (EWS)-4 अशा एकूण 100 जागा आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष संपर्क साधावा, असेही श्री. साळे यांनी केले आहे.