
no images were found
सारथी’मार्फत ‘संगणक शिकता शिकता कमवा’ योजनेवर प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी (लक्षित गट) या समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी सारथी संस्था कामकाज करीत आहे. लक्षित गटातील विद्यार्थ्यांच्या संगणकीय कौशल्य, इंग्रजी भाषा कौशल्य व संवाद कौशल्य विकासासाठी सारथी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील 50 हजार 250 विद्यार्थी हे “छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” (CSMS-DEEP) अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व 358 तालुक्यात एमकेसीएलच्या 3 हजार 100 प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी नॉन क्रिमिलियर संवर्गातील आहेत. त्यांना प्रशिक्षण वर्गात शिकलेल्या बाबींचा सराव करण्यासाठी “सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किरण कुलकर्णी, सह व्यवस्थापकीय संचालक सारथी कोल्हापूर, डॉ. जोतीराम कृष्णराव पवार, वसंतराव मुळीक, रंजना शिवाजी पाटील, श्री सचिन भोईटे, डॉ विलास पाटील व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विविध संगणक ज्ञानाच्या माध्यमातून जनतेची विविध कामे उदा. आधार कार्ड काढणे, पॅनकार्ड काढणे, विविध शासकीय योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरणे, डीटीपी करणे व त्याबदल्यात योग्य तो मोबदला देणे या उपक्रमांतर्गत समाविष्ट आहे. माहे एप्रिल व मे 2024 मध्ये या उपक्रमात 3401 विद्यार्थ्यांनी रक्कम रू. 38 लाख 64 हजार 995/- ची स्वकमाई केली आहे. यात कोल्हापूर सारथी कार्यालयामार्फत 346 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमार्फत 3 लाख 79 हजार रूपयांची स्वकमाई झाली. ताराबाई सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनः मान्यवरांच्या हस्ते करून झाली. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय रवींद्र पाटील यांनी केला.
प्रमुख वक्ते डॉ. जोतीराम कृष्णराव पवार, यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा शिवराज्याभिषेक दिन विषयक माहिती दिली. सरसेनापती वीर बाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा योजनेची माहिती सचिन भोईटे, जिल्हा समन्वयक कोल्हापूर यांनी दिली तर या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी स्वकमाई केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच उपस्थित विद्यार्थी व पालक यांचे मनोगत घेण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आलेले वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ, श्रीमती रंजना शिवाजी पाटील, जिजाऊ ब्रिगेड, जिल्हा प्रवक्ता, डॉ विलास पाटील, कार्यकारी अधिकारी, सारथी कोल्हापूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन सचिन भोईटे, जिल्हा समन्वयक कोल्हापूर, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांनी मानले.
सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या स्व-कमाईतून आईला दिली साडी
छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत हे राजमाता जिजाऊ माँसाहेब होत्या. याची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या योजनेत सहभागी विद्यार्थी आपल्या पहिल्या स्वकमाईतून आपल्या आईला साडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श व संस्कार आचरणात आणला. या योजने अंतर्गत तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर सारथी व MKCL च्या माध्यमातून या उपक्रमात जिल्हयात एकुण सहभागी 346 विद्यार्थी हे कृतज्ञतापूर्वक आपल्या आई किंवा सासूला स्व – कमाईतून साडी देणार आहेत. यातील प्रातिनिधीक स्वरूपातील काही विद्यार्थ्यांनी साडी दिली.