
no images were found
पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्नरच्या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं
पुणे : फायनान्सवाले दमदाटी करतात, पत्संस्थेवाले अपशब्द वापरतात. अशी चिठ्ठी लिहून शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरातील रानमळा येथे ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद आळेफाटा पोलिसांत करण्यात आली आहे.दशरथ लक्ष्मण केदारी या अल्पभूधारक शेतकऱ्याने शनिवारी ही आत्महत्या केली आहे.
कर्जबाजारीपणा व शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार फायनान्सवाले दमदाटी करतात व पतसंस्थेवाले अपशब्द वापरतात. त्यात शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळत नाही. याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहेत. मोदींचा शेतीवर कंट्रोल नाही. त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे दशरथ केदारी यांनी पत्रात नमूद केले होते. पत्राच्या शेवटी नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यात ही घटना घडल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
खासगी कर्ज देणाऱ्या कंपन्या आणि पतसंस्था यांच्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
कर्ज काढून खरीप हंगामातील पेरणीचा खर्च केल्यानंतर पावसाने दगा दिला. पेरण्या उलटल्याने उसनवारीतून दुबारचे आव्हान पेलले. शेत हिरवेगार होऊ लागले असतानाच अतिवृष्टी झाली. जमिनी खरडून गेल्याने रब्बीतही पेरणी करणे कठीण दिसू लागले. कर्ज, उसनवारी आणि रोजच्या जगण्याचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेने शेतकऱ्यांना ग्रासले. यातूनच अवघ्या साडेआठ महिन्यांत एकट्या विदर्भात ९६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सरकारी आकडेवारीतून पुढे आले आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २१४ तर आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात एकाही घटनेची नोंद नाही.