
no images were found
येत्या तीन दिवसांत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार
पुणे : येत्या तीन दिवसांत यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात २० सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात आणखी काही दिवस पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत.
‘पश्चिम बंगाल, ओडिशा किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात येत्या २० सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात २० आणि २१ सप्टेंबरला; तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात २२ तारखेला पावसाची शक्यता आहे,’ असेही आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर आहे. यंदा उत्तर प्रदेशवर सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर आणि मध्य भारतात पाऊस सप्टेंबरच्या मध्यातही सक्रिय राहिला. आता मात्र, मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली स्थिती वायव्य भारतात तयार होत असल्याचे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे. ‘वायव्य भारतावर वातावरणाच्या जमिनीलगतच्या थरात तयार झालेल्या अँटी सायक्लोन स्थितीमुळे पुढील पाच दिवस पश्चिम राजस्थानसह पंजाब, हरियाणा, दिल्ली येथे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या अनुकूल स्थितीमुळे तीन दिवसांत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो,’ असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.