
no images were found
गाडीसाठी ‘चॉइस’चा नंबर हवाय, भरावे लागणार लाखो रुपये
पुणे : राज्य सरकारने ‘चॉइस’ क्रमांकासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केल्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, तीस दिवसांत अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. या अधिसूचनेनुसार आता चारचाकी वाहनाला ‘०००१’ या क्रमांकासाठी आता पाच लाख रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, पुणे, मुंबईसह राज्यातील नऊ शहरांमध्ये त्याच क्रमांकासाठीचा दर सहा लाख रुपये असणार आहे.
राज्य सरकारच्या गृह विभागाने १५ सप्टेंबर रोजी ‘चॉइस नंबर’बाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत ‘चॉइस’ नंबर घेण्यासाठीच्या सध्याच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. या बदलांनुसार कोणत्याही चॉइस नंबरच्या वाटपासाठी किंवा त्याचा अर्ज ऑनलाइन परिवहन पोर्टलवर करता येणार आहे; तसेच या अधिसूचनेनुसार पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, रायगड, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये चारचाकी वाहन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला इतर शहरांच्या तुलनेत एक लाख रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. या नऊ शहरांव्यतिरिक्त अन्य शहरांमध्ये चार चाकी वाहनांसाठी हे दर पाच लाख रुपये असे ठेवण्यात आलेले आहेत.
एखाद्या व्यक्तीने शासकीय शुल्क देऊन एखादा चॉइस क्रमांक घेतला असल्यास, त्याला सहा महिन्यांच्या आत गाडी आरटीओ कार्यालयात दाखवावी लागणार आहे; तसेच चॉइस क्रमांक हा सहा महिन्यांच्या आत केवळ नजीकच्या कुटुंबातील सदस्यांकडे यात पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी यांनाच हस्तांतर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
पुण्यात चारचाकी वाहनासाठी ‘चारचाकी नोंदणी क्रमांक मालिके’तून ‘०००१’ क्रमांक घेतल्यास त्याला सहा लाख मोजावे लागणार आहेत; तर दुचाकीच्या नोंदणी क्रमांक मालिकेतून ‘०००१’ नंबर चारचाकीसाठी घेतल्यास त्याला तीन पट किंमत मोजावी लागणार आहे. म्हणजेच, अशा क्रमांकासाठी वाहन मालकाला १८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.