
no images were found
सणासुदीच्या काळात पगार रखडण्याच्या शक्यतेने एसटी कर्मचारी संपावर जाणार?
मुंबई: आता शिंदे सरकारच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार का, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होतो तेव्हा कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी पुढील चार वर्षे ३६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. परंतु, आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने निधीला कात्री लावल्यास पुढील महिन्यात सणांच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. दिवाळीच्या काळात बोनसची अपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन तरी मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
राज्यातील नागरिकांना नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांचे वेध लागलेले असताना, एसटी महामंडळातील एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा एसटीसंपाची चाचपणी सुरू केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे २०२०पासून थकीत देणी तातडीने देणे, मॅक्सीकॅबला प्रवासी परवाने देऊ नये या आणि अशा एकूण ३४ मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिलेली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. मार्च २०२२मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली आहे .