no images were found
‘वागले की दुनिया’ मालिकेत वागले कुटुंबातील ज्येष्ठ दांपत्य श्रीनिवास आणि राधिका यांची रोमॅंटिक डेट नाइट
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, त्याचे छोटे छोटे विजय यांचे चित्रण बघायला मिळते. अलीकडच्या भागांमध्ये घरातील सर्वात ज्येष्ठ असलेल्या श्रीनिवास (अंजन श्रीवास्तव) ला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा वागले कुटुंब हादरून गेले होते. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमावण्याची मोहीम घरातल्या सगळ्याच मंडळींनी अंगावर घेतली. त्याच वेळी त्यांच्या लक्षात आले की, शस्त्रक्रिया म्हणजे वागले कुटुंबाकडून पैसे उकळण्यासाठी डॉक्टरांनी रचलेला एक सापळा होता. सुदैवाने राजेश (सुमित राघवन) आणि त्याची मुलगी सखी (चिन्मयी साळवी) यांना वेळेवर सत्य काय ते समजते, त्यामुळे अनावश्यक शस्त्रक्रियेपासून श्रीनिवासचा बचाव होतो.
आगामी भागांमध्ये, श्रीनिवासची प्रकृतीवरील संकट टळून त्याची तब्येत झपाट्याने सुधारते. या घातक प्रसंगातून बचावलेला श्रीनिवास आणि राधिका (भारती आचरेकर) एकमेकांसोबत मजेत वेळ व्यतीत करण्याचे ठरवतात. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतरही आपल्या नात्यातील रोमान्स जिवंत ठेवण्यासाठी ते दोघे एक खास डेट नाइट करण्याचे ठरवतात. ही फार गोड गोष्ट आहे, कारण यात आजी-आजोबा आपल्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सहवासाची गोडी अनुभवणार आहेत.
राधिकाची भूमिका करत असलेली भारती आचरेकर म्हणते, “या भागासाठी शूटिंग करायला खूप मजा आली. हे एक फारच गोड आणि हृदयस्पर्शी दृश्य आहे. कारण इतके ज्येष्ठ दांपत्य क्वचितच अशा प्रकारे डेटवर गेलेले दिसते. ही कहाणी उत्तम प्रकारे मांडल्याबद्दल क्रिएटिव्ह टीमचे अभिनंदन. मला आशा आहे की, प्रेक्षकांना हे कथानक नक्कीच आवडेल.”
श्रीनिवासची भूमिका करणारा अंजन श्रीवास्तव म्हणतो, “वागले की दुनिया मालिकेत जीवनातील छोट्या छोट्या आनंदाचे हृदयस्पर्शी क्षण उत्तम प्रकारे सादर केले जातात. जीवनातील अनेक चढ-उतार एकमेकांच्या सोबतीने पार केलेले श्रीनिवास आणि राधिका हे जोडपे अनुभवांनी प्रगल्भ झालेले आहे. या उतारवयात ते दोघे त्यांच्यातील रोमान्स जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे पाहताना मनाला आनंद वाटतो. मला आशा वाटते की, प्रेक्षकांना हे कथानक नक्की आवडेल आणि त्यांच्यातील ज्येष्ठ नागरिक आपल्या जोडीदारासोबत अशा पद्धतीने अधिकाधिक वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न करतील.”