
no images were found
सर्व व्यवहार बंद ठेवत उचगावचा कोल्हापूर हद्द्वाढीला विरोध
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक असताना राजकीय समन्वयाअभावी परस्थिती गंभीर बनत चालली आहे. या हद्दवाढीला कोल्हापूर शहराला लागून असलेल्या अनेक गावांनी विरोध दर्शविल्यामुळे शहराच्या हद्दवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहर असा संघर्ष अधिकच बळावत चालला आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या उचगाव ग्रामस्थांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून शहर हद्दवाढीला विरोध दर्शवला आहे.
कोल्हापूर शहराच्या अगदी जवळ असलेले उचगाव हे सगळ्यात मोठं गाव आहे. दरम्यान उचगावने आपणास कोणत्याही परिस्थितीत शहरात समाविष्ट होणार नसल्याची भूमिका दर्शविली आहे. काही व्यावसायिक तसेच बिल्डर यांच्यासाठी हद्दवाढीचा घाट घातला जात असल्याचे उचगावच्या ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न न सुटता तो अधिक क्लिष्ट बनतोय.
हद्दवाढविरोधी समितीने रविवारी बैठक बोलावली होती. यावेळी बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. या प्रीस्तीतीचा विचार करत राजकीय नेते या विषयावर स्पष्ट भूमिका घेत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते. हद्दवाढ विरोधी कृती समितीने खासदार, आमदार आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रणे पाठवूनही बैठकीला कोणीही हजर नव्हते. विरोधी कृती समितीचे राजू माने यांनी सांगितले की, आम्हाला ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळत आहे. हद्दवाढ कृती समितीचे मनसुबे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. या बैठकीला हद्दवाढीत असणाऱ्या गावांचे सरपंच उपस्थित होते. ग्रामस्थांना सेवा पुरविण्यात लक्षणीय प्रगती केली आहे आणि म्हणूनच हद्दवाढ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. लवकरच, आम्ही पुन्हा भेटून आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत; असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.