
no images were found
मतदार साक्षरता मोहिमेत शिवाजी विद्यापीठाने भरीव योगदान द्यावे
कोल्हापूर : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यास त्याचे श्रेय युवा मतदारांना द्यावे लागेल, असे प्रतिपादन करुन मतदार साक्षरता मोहिमेच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घ्यावी, असे भरीव योगदान शिवाजी विद्यापीठाने द्यावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. यावेळी मतदार नोंदणीत उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. श्री देशपांडे म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येत युवा मतदार 35 टक्के आहेत. निवडणूक आयोगाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निवडणूक कामकाजाच्या प्रशिक्षणाची (इंटर्नशिप) संधी देण्यात येत आहे. हे विद्यार्थी मतदार जनजागृती बरोबरच मतदान व मतमोजणी दिवशी मतदान व मतमोजणी केंद्रावर स्वयंसेवक म्हणूनही काम करतील, यामुळे त्यांना निवडणूक प्रक्रियेचे काम जवळून पाहता येईल. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान, मतमोजणी प्रक्रियेची माहिती जाणून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींची मतदार नोंदणी चांगली झाली असून येत्या निवडणुकांमध्ये नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा. यासाठी मतदान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासारखे प्रोत्साहनपर कार्यक्रम महाविद्यालयांनी आयोजित करावेत व जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले. केआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार साक्षरतेबाबत सादर केलेल्या पथनाट्याचे कौतुक करुन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अशा पथनाट्याद्वारे गावोगावी जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.
डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणी प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याचा सुरु केलेला उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया व शासकीय कामकाज जवळून पाहता येईल. तसेच त्यांना या कामाची आवड निर्माण होईल. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून आजवर अनेक शासकीय उपक्रम तसेच मतदार साक्षरता कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी शिवाजी विद्यापीठ भविष्यातही मोलाचे सहकार्य करेल, असे आश्वासन देऊन निवडणूक साक्षरता मंचामध्ये विद्यापीठाची भूमिका त्यांनी मांडली.