no images were found
मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका !
मराठा आरक्षणसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी ते कट रचत आहेत. सलाईनमध्ये विष देऊन मला मारण्याचा विचार चालू आहे. माझे एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे. असे गंभीर स्वरुपाचे आरोप जरांगे यांनी केले आहेत. ते आज (२५ फेब्रुवारी) अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना उद्देशून बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे यांनी राज्यात घडलेल्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडींचा पाढाच वाचला. त्यांनी अनेक नेत्यांवर दबाव टाकला, असे जरांगे म्हणाले. तसेच फडणवीसांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचायला सुरुवात केली आहे. मात्र मी घाबरणार नाही. मी फडणवीसांचा ब्राह्मणी कावा चालू देणार नाही, असंदेखील जरांगे फडणवीसांना उद्देशून म्हणाले.
“माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांचं न ऐकल्यावर काय होतं, ते तुम्हाला सांगतो. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही, अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडून जावे लागले. पंकजा मुंडे आयुष्यातही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीयेत,” असे जरांगे म्हणाले.
जरांगे यांनी राष्ट्रवादीतील (अजित पवार गट) काही नेत्यांची नावे घेत या नेत्यांवर फडणवीसांनी दबाव टाकला. त्यांना शरद पवारांची साथ सोडण्यास भाग पाडले, असाही आरोप केला. “जीव जरी गेला, फासावर लटकवलं तरी प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते. मात्र प्रफुल्ल पटेल यांना तुरुंगाची भीती घालण्यात आली. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपाशी हातमिळवणी करावी लागली. अजित पवार हे कधीच राष्ट्रवादीला सोडू शकत नव्हते. पण तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपाशी हातमिळवणी केलेली बरी, म्हणून अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले. छगन भुजबळ आणि अजित पवार यांचं कधीही जमत नाही. छगन भुजबळ कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. फडणवीस तुरुंगात टाकतील म्हणून भुजबळांना अजित पवारांसोबत जावे लागले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांची शिवसेना कधीच सोडू शकत नव्हते. मात्र नाईलाजामुळे त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. अशोक चव्हाण यांच्या घरात तीन वेळा मुख्यमंत्रिपद दिलं आहे. ते कधीच काँग्रेस पक्ष सोडू शकत नव्हते. मात्र त्यांना भाजपात जावे लागले,” असे मनोज जरांगे म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस कोण आहेत, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. एक झालेल्य मराठ्यांशी ते काय करू पाहतायत हे मला तुम्हाला सांगायचे आहे. कारण मला ही माहिती फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी सांगितली. माझ्याविरोधात फडणवीस बदनामीचे षडयंत्र वापरतील. फडणवीसांमुळे अनेकांना भाजपा सोडण्याची वेळ आली. मी ज्या लोकांची नावे घेत आहे, त्यांनी हे सगळं मान्य करायला हवं. ब्राह्मणी कावा मी माझ्याविरोधात चालू देणार नाही. मनोज जरांगे हे मराठ्याचं पोर आहे. हा ब्राह्मणी कावा जर नाही थांबवला तर मी माझं नाव बदलतो,” असं मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तसेच मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पायी जाणार आहे. मी रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर नेऊन टाका, असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले.फडणवीसांनी काय आरोप करायचे ते करावे. पण मी मराठ्यांना सोडणार नाही. मला फडणवीस या नेत्यांच्या पंक्तीत बसवत आहेत. मी मरायला तयार आहे. फडणवीस हे मनोज जरांगेंच्या नादी लागले आहेत, असं खुलं आव्हान जरांगे यांनी फडणवीसांना दिलं.