no images were found
सूर्याच्या पडलेल्या तुकड्या बाबत वैज्ञानिक, नासाही संभ्रमात
नवी दिल्ली : पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य. याच सूर्याच्या पृष्ठभागावर मोठं वादळ निर्माण झालं आहे.विशेष म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचा एक मोठा तुकडा पडून त्यामधून हे वादळ निर्माण झालं आहे. सध्या हे वादळ सुर्याच्या भोवती परिक्रमा करत आहे. हा सारा प्रकार पाहून वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे. नेमकं हे घडलं कसं याबद्दलची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सध्या खगोलशास्त्रज्ञ करत आहेत.
अंतराळामधील ही घटना नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने रेकॉर्ड केली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ अंतराळ हवामानतज्ज्ञ असलेल्या वैज्ञानिक डॉ.तमिता स्कोप यांनी शेअर केला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षांच्या एका सौरचक्रादरम्यान सामान्यपणे सूर्याच्या 55 डिग्री अक्षांशाजवळ असामान्य गोष्टी घडल्याचं पहायला मिळतं. मात्र यंदा जे घडलं आहे ते पाहून वैज्ञानिकही बुचकाळ्यात पडले आहेत.
दुर्लक्ष करता येणार नाही : डॉ. स्कोप
डॉ. स्कोप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ध्रुवीय वादळासंदर्भात सांगायचे झाल्यास नॉर्दन प्रॉमिनेन्समुळे मटेरियल कधी कधी मुख्य फिलामेंटपासून वेगळं होतं. आता आपल्या उत्तर ध्रुवाच्या चारही बाजूला एक मोठ्या आकाराचं ध्रुवीय वादळ घोंगावत आहे. येथे सूर्यच्या वायूमंडळामधील 55 डिग्रीहून अधिक गतीबदल आपल्यावर होणारे परिणाम पाहता दुर्लक्षित करता येणार नाही,”
सूर्याचा जो भाग तुटून वेगळा झाला आहे तो एखाद्या मोठ्या सौरवादळाप्रमाणे दिसत आहे. सुर्याच्या पृष्ठभागावरुन अनेकदा आगीच्या ज्वाला आणि सौरवादळे उसळत असतात. आगीच्या या ज्वाला फारच दूरपर्यंत जातात. डॉ. स्कोप यांनी अन्य एका ट्वीटमध्ये सोलार पोलर व्हर्टेक्स्टवर संशोधनामधून असं दिसून आलं आहे की जवळजवळ 60 डिग्री अंशावरुन ध्रुवाभोवती फिरण्यासाठी 8 तास लागले होते. यावरुन अंतराळामधील हवेतील याची सर्वाधिक गती 96 किमी प्रति सेकंद इतकी असू शकते.
असं वादळ यापूर्वी पाहिलं नाही
अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्पेरिक रिसर्चचे सोलर फिजिसिस्ट स्कॉट मॅकिन्टोश मागील अनेक दशकांपासून सूर्याचा अभ्यास करत आहेत. त्यांनी स्पेस डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये यापूर्वी असं सौरवादळ आपण पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे.
नासाने यासंदर्भातील माहिती देताना अशा घटनेची पहिल्यांदाच नोंद झालेली असल्याचं म्हटलं आहे. मात्र सूर्याचा तुकडा पडणं ही चिंतेची बाब असल्याचं नासाने नमूद केलं आहे. सूर्यावर 24 तास नजर ठेवली जाते. सूर्यावरील बारीक सारीक हलचालींचीही नोंद ठेवली जाते. धरतीवर याचा काय परिणाम होणार याचा अंदाज बांधता यावा म्हणून सूर्यावर अशी नजर ठेवली जाते. सामान्यपणे सूर्यावरील घडामोडींचा जागतिक संवाद क्षेत्रावर म्हणजेच कम्युनिकेशनवर परिणाम होण्याची शक्यता असते. मोबाईल रेंज, कनेक्टीव्हीवर सूर्यावरील उष्णतेच्या वादळांचा परिणाम होतो.