no images were found
राज्यातील गुंतवणूक थांबू देणार नाही : मुख्यमंत्री
1 जून 2022 नंतरचा भूखंड वाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आला आहे. यावरून शिंदे सरकारवर टीका होत होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण व्यक्त करताना ते म्हणाले, महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक थांबू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय सुरूच आहे. त्यातच आता एमआयडीसी भूखंड वाटपाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गुंतवणुकीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
भूखंड वाटपाच्या स्थगितीमुळे उद्योगांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप सरकारवर केला जात होता. यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली. नाराज उद्योजक वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यातून केला आहे. उद्योगांची गुंतवणूक थांबू नये, यासाठी उद्योगमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांना आदेश देण्यात आले असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये येथे बोलताना सांगितले. जे भूखंड दिलेले आहेत, त्याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, त्याला स्थगिती दिलेली नाही, असेही स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. गुंतवणूक कुठेही थांबता कामा नये, यासाठी तातडीने काम करण्यासाठीच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे नमूद केले आहे.