no images were found
निलंबित निरीक्षक बकालेंवर गुन्हा दाखल
जळगाव : मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या प्रकरणी येथील गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा हजेरी मास्तर अशोक महाजन याला निलंबित करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होऊन तीव्र पडसाद उमटले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बकाले यांना मंगळवारी (ता.१३) मध्यरात्रीच गुन्हेशाखेचा पदभार काढून घेत नियंत्रण कक्षात बदली केली.
बुधवारी समस्त मराठा समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी, राजकीय नेत्यांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून खातेंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, खात्यातून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातून मागणी करण्यात येत आहे. विनोद पंजाबराव देशमुख यांनी आज जिल्हायपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात नमूद केल्याप्रमाणे, निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य करून शिवीगाळ केल्याच्या व्हायरल क्लिपच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक डॉ. मुंढे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. बकाले यांची खातेंतर्गत चौकशी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंता यांना सोपविण्यात आली आहे.