no images were found
शासकीय विभाग व बँकांनी एकत्र येऊन नवीन उद्योजक घडवावेत व जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती द्यावी – प्रकाशराव आबिटकर
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापकपणे व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व शासकीय विभाग, सर्व बँका यांचा एकत्र समन्वय साधून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळावा इंजुबाई सांस्कृतिक भवन, गडहिंग्लज रोड, भुदरगड येथे संपन्न झाला.
सर्व विभागांनी लोकांना अनुदानाच्या योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळवून द्यावा व बँकांनी काही योजनेमध्ये खूप चांगला कर्ज पुरवठा केला असून सर्व योजनेमध्ये अजून सकारात्मक भूमिका घ्यावी. दोन्ही घटकांनी मिळून नवीन उद्योजक घडवावेत व जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती द्यावी त्यामुळे यशस्वी उद्योजक कुटूंब तयार होतील, असे आवाहन आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी केले.
समाजातील सर्वच घटक कर्ज घेतात परंतु आपण व्यवसायासाठी कर्ज घ्यावे. व्यवसाय मोठा करावा आणि नंतर त्यातूनच गाडी, घर अशी स्वप्न पूर्ण करावीत. तरुण पिढीने कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, आपली पत बँकेत वाढवावी आणि आपला विकास करावा, असे आवाहन प्रांताधिकारी वसुंधरा बरवे यांनी केले.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक तालुक्यात मेळाव्यांच्या स्वरुपात राबविला जात आहे. भुदरगड तालुक्याच्या मेळाव्यात 600 ते 700 लोकांनी माहिती घेतली. मागील वर्षापासून सुरु असलेल्या मेळाव्यामुळे सर्व शासकीय विभाग, बँका व लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या मेळाव्यामुळे विविध शासकीय योजनांची जनजागृती झाली असून सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवुन याचा परिणाम चांगला दिसत आहे. अनेक योजनांमध्ये बँक व शासकीय विभागांच्या योग्य समन्वयातून कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याचे श्री. गोडसे यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत 11 तालुक्यांमध्ये मेळावे झाले असून भुदरगड येथील मेळावा हा शेवटचा बारावा मेळावा असून जिल्ह्यामधील सर्व मेळाव्यांना 9500-10000 लोकांनी भेट दिली, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या लोकांसाठी सर्व विभाग आज येथे उपस्थित आहेत. भुदरगड तालुक्यातील सर्व लोकांनी या संधीचा फायदा करुन घ्यावा. नवीन उद्योग उभे राहावेत आणि तालुक्याचा विकास करावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, अपर तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार सुशांत कांबळे, भुदरगड सरपंच प्रकाश वास्कर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते.कर्ज मेळाव्यास 21 विविध विभागांचे अधिकारी, तालुक्यांतील सर्व बँकांचे अधिकारी- कर्मचारी त्यांच्या योजनांचे माहिती पत्रक, कर्ज मागणी अर्ज व इतर आवश्यक माहितीसह उपस्थित होते.