no images were found
महापालिकेत दि.17 सप्टेंबरपासून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सामान्य नागरीकांच्या विविध तक्रारी अर्जांवर विहीत मुदतीत कार्यवाही होवून अशा तक्रारी निर्गत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांअंतर्गत महानगरपालिकेकडे प्रलंबित असलेले सर्व अर्ज निकाली काढण्याकरीता प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सर्व विभाग प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत. यामध्ये शासन निर्देशानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अन्वये जाहीर केलेल्या सेवा, आपले सरकार पोर्टल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नवीन नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे, मागणी पत्र देणे व विविध विभागांकडील प्रलंबित असणारे तक्रारी व मागणी अर्ज यांची तातडीने पूर्तता करण्यात येणार आहे. यामध्ये दरदिवशी निर्गत होणारे तक्रारींबाबतचा अहवाल घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेचे सर्व विभाग आपले कार्यालयाकडील रेकॉर्ड वर्गवारी करून व्यवस्थित लावून कार्यालयांची स्वच्छता करण्यात येणार आहे.
या सेवा पंधरवडयाचे समाप्तीनंतर दि.5 ऑक्टोबर 2022 रोजी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दि. 10 सप्टेंबर अखेर प्रलंबित प्रकरणांपैकी निर्गत केलेल्या व निर्गत न झालेल्या अर्जांबाबत स्वयंस्पष्ट कारणांसह प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतर या सेवा पंधरवडयातील कामकाजाचा प्रगती अहवाल दि.10 ऑक्टोबर 2022 पर्यत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यासेवा पंधरवडयानिमित्त शहरातील नागरीकांची प्रलंबित असणारे विविध अर्ज/तक्रारी निकाली होण्यास मदत होणार आहे.