no images were found
नियोजित ‘न्यू काॅलेज ऑफ फार्मसी‘ काॅलेजचे उद्घाटन
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या शतकमहोत्सवी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या नियोजित ‘न्यू काॅलेज ऑफ फार्मसी’ या दहाव्या विद्याशाखेचे उद्घाटन उचगांव येथील शिक्षण संकुलामध्ये झाले. या समारंभास शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, क्रिडा अधिकारी स्नेहल पाटील, संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, हुतात्मा उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी व सर्व संचालक उपस्थित होते.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मानकांनुसार सर्व शैक्षणिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे फार्मसी काॅलेज संस्थेने उभे केले आहे. इथे गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षणाची हमी संस्थेने दिली आहे. न्यू काॅलेज ऑफ फार्मसीच्या कोनशिलेचे अनावरण आमदार जयंत आसगावकर यांचे शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शाहीर आझाद नायकवडी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या हस्ते स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीवर पोवाडा सादर केला. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे विकास अधिकारी डाॅ. संजय दाभोळे यांनी केली.
संस्थेचे संचालक प्रा. विनय पाटील, संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, हुतात्मा उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक वैभव नायकवडी, आ. जयंत आसगावकर, संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी संस्थेविषयी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अभियंता दिनानिमित्त भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांचा ७६ वा वाढदिवस केक कापून व त्यांना न्यू पॉलिटेक्निकच्या वतीने मानपत्र देवून साजरा करण्यात आला. व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. मनिषा नायकवडी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता डाॅ. मनिषा नायकवडी यांच्या सुमधूर आवाजातील वंदे मातरम गीताने झाली.