
no images were found
कोल्हापूरच्या गतिमान विकासासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली पंचसूत्री
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : कृषी , वस्त्रोद्योग, फौंड्री या क्षेत्रात मोठया क्षमता असलेल्या कोल्हापूरचा भविष्यात गतिमान विकास साधण्यासाठी उद्योग व्यवसायांना डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे आहे असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. उद्योजक आणि व्यावसायिकांनी उद्योग व्यवसायांच्या विकासा साठी नॉलेज क्लस्टर तयार करावे त्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी कोल्हापूरच्या विकासासाठी डॉ. माशेलकर यांनी पंचसूत्री मांडली.
डी वय पाटील गृपच्यावतीने हॉटेल सयाजी येथे कोल्हापूरचे वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रातील भविष्य या विषयावर आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील,मासिक जडणघडणचे मुख्यसंपादक डॉ. सागर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, जगाने आणि भारताने तंत्रज्ञानाच्या जोरावर केलेल्या विकासाची माहिती दिली. उद्योग व्यवसायातील यशासाठी पैशा पेक्षा कल्पकता महत्वाची आहे. अल्पसंतुष्ट न राहता असंतुष्ट राहत प्रगती साधावी. त्यासाठी मोठया आकांक्षा ठेवा , हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा, संधींची दारे ठोठावत बसण्या पेक्षा स्वतः संधी निर्माण करा, सातत्यपूर्ण कष्ट करा आणि मिळालेल्या यशावर समाधानी न राहता माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अजून मला मिळवायचंय असा विचार सातत्याने करा, ही पंचसूत्री कोल्हापूरच्या एक्सपोनेनशियल ग्रोथ साठी उपयुक्त ठरेल आणि कोल्हापूरला देशात आणि जगात अव्वल बनवेल असा विश्वास डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. माशेलकर म्हणाले,उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सरकार कडून आवश्यक त्या प्रमाणात सवलती मिळणे गरजेचे आहे.उद्योगा बरोबर देशाच्या विकासात सेवा क्षेत्राचा वाटा मोठा आहे. कोल्हापूरला सुद्धा त्यामध्ये मोठया संधी असून त्यासाठी डीजीटल तंत्रज्ञानाचा वापर करा. सध्या विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती कुठपर्यंत जाणार हे माणसांच्याच हाती असून या प्रगतीला मूल्यांचे अधिष्ठान गरजेचे आहे.
आ. सतेज पाटील यांनी प्रास्ताविकात म्हणाले, पुण्यानंतर कोल्हापूर मध्ये विकासाच्या मोठया क्षमता आहेत. कोल्हापूरच्या कनेक्टिव्हिटी चे सर्व प्रकल्प पूर्ण होताच 2026 हे वर्ष कोल्हापूरचे असेल असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राच्या विकासासाठीसाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सागर देशपांडे यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा कोल्हापूर आणि परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिकांशी संवाद घडवून आणण्याचे आपलं स्वप्न आमदार सतेज पाटील यांच्यामुळे साकारले असल्याचे सांगत या संवादातून कोल्हापूरच्या विकासाला दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा परिचय करून दिला. आमदर ऋतुराज पाटील यांनी आभार मानले. प्रा. मधुगांधा मिठरी व प्रा. श्रुती काशीद यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी जडण घडणच्या संपादक सौ. स्मिता सागर देशपांडे, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ ए. एन. जाधव, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कुलगुरू डॉ.राकेशकुमार मुदगल, कृषी व तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ. के प्रथापन यांच्यासह उद्योग, बांधकाम, आर्कीटेक्ट, शिक्षण, कृषी, कंपनी सचिव, चेम्बर ऑफ कॉमर्स, सीआयआय, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन, कोल्हापूर आयटी असोसिएशन, क्रेडाई, इंडियन मेडिकल असोसिएशन, शिरोली मन्यूफक्चरिंग असोसिएशन,गोशीमा, माक, लॉयर्स असोसिएशन सह इचलकरंजी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, डी वाय पाटील ग्रुप मधील विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आदी उपस्थित होते.