no images were found
मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’ : खा. महाडिक
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :भारतीय जनता पार्टीतर्फे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे राज्य सभा खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खा. धनंजय महाडिक बोलत होते.
खा. धनंजय महाडिक महणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणा-या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरेटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात देणार आहेत.
खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या सहित महाराष्ट्र भाजपा प्रदेश पदाधिकारी, पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्राम पंचायत सदस्य व जिल्हा पदाधिकारी, प्रवासी कार्यकर्ते म्हणून प्रत्येक बुथवर मुक्कामी प्रवास करणार आहेत. या अभियानात प्रत्येक बुथवर प्रवास करणारे प्रवासी कार्यकर्ते लोकसभा निवडणूक होई तोपर्यंत दर पंधरा दिवसांनी सातत्याने त्या बुथवर जाऊन तेथील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
प्रत्येक बुथवरती भाजपाचा प्रवासी कार्यकर्ता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करेल. असेही खा महाडिक यांनी सांगितले. गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभा मतदारसंघात साधारण ३.५ लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी नमूद केले, प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने युवकांसाठी ‘नमो चषक’ तसेच महिलासाठी “शक्ति वंदन कार्यक्रम’ देखील राबवण्यात येत आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे शक्तिवंदन कार्यक्रमाद्वारे महिला बचत गट प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याची माहिती खा. धनंजय महाडिक यांनी दिली.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, रूपाराणी निकम उपस्थित होते.