Home शासकीय जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – अजित पवार 

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – अजित पवार 

20 second read
0
0
34

no images were found

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – अजित पवार 

 

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत, विभागीय क्रीडा संकुल, शेंडा पार्क येथील प्रशासकीय इमारत, रंकाळा सुशोभीकरण यासह जिल्ह्यातील विविध विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देवू,  अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

        उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्ह्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

         उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले,  कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. रंकाळा हे कोल्हापुरातील महत्त्वाचे ठिकाण असून कोल्हापूरकरांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. श्रीक्षेत्र अंबाबाई व श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याप्रमाणेच रंकाळ्याचा विकास आराखडा तयार करा. यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे सांगून रंकाळ्याच्या तटबंदीची दुरुस्ती करुन घ्या. झाडांना पार बांधून घ्या. सार्वजनिक ठिकाणच्या वास्तूंची डागडुजी त्या त्या वेळीच करुन घ्या. विकास कामे करण्यासाठी चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमा, ही कामे करताना शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याचे कटाक्षाने पालन करा. रंकाळयासह शहर परिसरात दैनंदिन साफसफाई होत असल्याची पाहणी करुन शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या विजेच्या खांबावरील विद्युत व्यवस्था आवश्यक त्याच वेळेत सुरु ठेवून विजेची बचत करा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. इमारतींचा विकास करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.

      कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ व सर्वांनी मार्गी लावले आहेत. सध्या प्रलंबित असणारे विषय नक्कीच सोडवले जातील. शासन स्तरावर धोरणात्मक निर्णयासाठीच्या विषयांबाबत लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घ्यावी, त्यांनी मंजुरी दिलेल्या कामांना निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तर मंजूर झालेली कामे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून समन्वयाने करुन घ्यावीत. तसेच जिल्ह्यातील प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी त्या त्या विभागांनी शासन स्तरावर पाठपुरावा करा, असे त्यांनी सांगितले.

       विकास आराखडे बनवताना भविष्यातील लोकसंख्या वाढ, हद्दवाढ याचा विचार करुन ही विकास कामे दर्जेदार पद्धतीने करावीत, अशा सूचना करुन शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणारी हद्दवाढ व विकास आराखड्यांना सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव किमान 10 दिवस चालल्यास जिल्ह्याचा पर्यटन दृष्ट्या विकास साधला जाईल व दसरा महोत्सवाला आणखी महत्व येईल, यासाठी पर्यटन विभागाने या महोत्सवाला पर्यटन विभागाने सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी दुरध्वनीद्वारे या विभागाच्या सचिवांना दिल्या. काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करुन घ्यावे लागणार असल्याने त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करा, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

      कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रलंबित प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेचा जीएसटीच्या वाढीव दराचा प्रस्ताव, इचलकरंजी महानगरपालिकेचा बंदिस्त सांडपाणी व्यवस्थापन व अन्य प्रस्ताव, नवीन विश्रामगृह इमारतीचे बांधकाम, विभागीय क्रीडा संकुलाचा विकास, बारामतीच्या धर्तीवर कोल्हापुरात ग्रंथालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा, हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येईल. तर माणगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे, प्रशासकीय इमारत बांधकाम, रंकाळा तलाव सुशोभीकरण कामांचे प्रस्ताव सादर करा, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देवू. श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा, दसरा महोत्सव, जुन्या पुलांचे जतन व संवर्धन, केशवराव भोसले नाट्यगृह टप्पा- क्रमांक २ साठी उर्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

       दूधगंगा गळती प्रतिबंधात्मक कामाची व घटप्रभा मध्यम प्रकल्पाची निविदा देवून पुढील कार्यवाही गतीने करा, धामणी प्रकल्पातील गावांना सानुग्रह अनुदानासाठीच्या प्रस्तावाला शासन स्तरावरुन मान्यता देण्यात येईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठीच्या आराखड्यास केंद्र शासनाकडून मान्यता दिली असून वर्ल्ड बँकेसमवेत सामंजस्य करार करण्याची कार्यवाही होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विभागांकडून विकास आराखडे तयार करण्यात येत असून यासाठी आवश्यक निधीची तरतूद व्हावी.खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठीची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शाहू मिल येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक, शेंडा पार्क येथील प्रशासकीय इमारत, कन्व्हेन्शन पार्क, इंजिनिअरिंग कॉलेज यांसह विविध विकास कामे व आराखड्याबाबत माहिती दिली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…