
no images were found
बलात्कारानंतर हत्या? दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवले
लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील निघासन पोलीस स्टेशन हद्दीतील लालपूर माजरा तमोली पूर्वा गावात अनुसूचित जातीच्या दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी विरोध केला.
याप्रकरणी सध्या 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी खून, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दोन मुली झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर लखीमपूर खेरीचे अतिरिक्त एसपी अरुण कुमार सिंह म्हणाले, “या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच त्यांची चौकशी सुरु आहे.” पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि मुलींच्या कुटुंबीयांनी निषेध मोर्चा काढून रास्ता रोको केला. कुटुंबीयांनी तीनजणांवर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला असून निघासन चौकात आंदोलनही केले.
या आंदोलन ठिकाणी लखीमपूर खेरीचे पोलिस अधीक्षक (एसपी) संजीव सुमन पोलिस दलासह पोहोचून ग्रामस्थांना असे आश्वासन दिले की, ‘आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल’ दरम्यान लखनौ रेंजचे पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी अशी माहिती दिली की, “लखीमपूर खेरीमधील एका शेतात दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. मृतदेहांवर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.” दोन बहिणींचं वय १५ आणि १७ वर्षे असल्याचं सांगण्यात आले आहे. मुलींच्या आईने माध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली चारा काढत असताना शेजारच्या गावातील तीन तरुणांनी बाईकवरून दोन मुलींना झोपडीजवळून पळवून नेण्यात आलेय; असा आरोप त्यांचेकडून करण्यात आला आहे.