no images were found
मराठा आरक्षणप्रश्नी मागासवर्ग आयोगाच्या हालचालींना वेग !
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. मध्यरात्री तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर राज्य सरकारने मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे मराठ्यांचा मोर्चा गुलाल उधळत आणि जल्लोष करत मुंबईच्या वेशीवरून (वाशी, नवी मुंबई) माघारी फिरणार आहे. आपण दिवसभर याबाबतच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. तसेच मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, यावरही आपलं लक्ष असेल. आरक्षणासह राज्यभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत.
राज्य सरकारने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समांतर पातळीवर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला पत्र पाठवून मराठा समाजातील नागरिकांच्या जमिनींची माहिती मागविली आहे. मराठा समाजातील नागरिकांकडे किती जमीन आहे याबाबतची १९६० ते २०२० या कालावधीतील माहिती मागविण्यात आली आहे. त्याकरिता आयोगाने एक नमुना तयार केला आहे.