no images were found
बोनलॉन इंडस्ट्रीज तळोजा येथे ॲल्युमिनियम प्लांट उभारणार
कोल्हापूर : कॉपर वायर उत्पादक बॉनलॉन इंडस्ट्रीज लिमिटेड आता अॅल्युमिनियम रॉड आणि इंगोट्स तयार करण्याचा प्रकल्प हाती घेत आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध बॉनलॉन इंडस्ट्रीज महाराष्ट्रातील तळोजा एमआयडीसीत आपला नवीन आधुनिक अॅल्युमिनियम प्रकल्प उभारणार आहे. सुरुवातीला वार्षिक उत्पादन क्षमता ७५ हजार टन असेल. हा प्रकल्प अॅल्युमिनियम भंगारापासून रॉड, वायर आणि इंगोट तयार करेल, ज्याची मागणी विविध क्षेत्रात वाढत आहे.
लवकरच उत्पादन सुरू करण्याची योजना
कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तळोजा येथे नवीन अॅल्युमिनियम प्रकल्पासाठी जागा घेण्यात आली असून लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. नवीन प्रकल्पाचे उत्पादन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासूनच सुरू करण्याचे नियोजन आहे. नवीन प्रकल्पामुळे कंपनीच्या व्यवसायात वार्षिक २०० ते २५० कोटी रुपयांचे योगदान मिळेल आणि निव्वळ नफ्याचे मार्जिन ४ ते ५ टक्के असेल. अरुणकुमार जैन कुटुंबाने प्रवर्तित केलेली बोनलॉन इंडस्ट्रीज ही २५ वर्षे जुनी कंपनी असून ती प्रामुख्याने तांब्याच्या तार आणि रॉडची निर्मिती करते. प्रवर्तक समूहाचा बोनलॉनमध्ये ६४ टक्के हिस्सा आहे
कारभार चार पटींनी वाढला
बॉनलॉन समूहाची ही कंपनी तांब्याच्या तारनिर्मितीबरोबरच फेरस व नॉन फेरस धातूंचा व्यवसाय, हॉटेल व्यवसाय व नागरी बांधकाम यातही कार्यरत आहे. विविध उद्योग क्षेत्रात तांब्याची तार आणि रॉडच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या तीन वर्षांत त्याची उलाढाल १३५ कोटींवरून सुमारे ४ पटीने वाढून ५११ कोटी रुपये झाली आहे. मात्र, तांब्याच्या किमतीतील प्रचंड चढउतार आणि उच्च व्यापार उत्पन्न यामुळे नफ्याचे मार्जिन कमी राहिले आहे. पण आता कंपनी नफा वाढवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगवर भर देत आहे. यातून येत्या आर्थिक वर्षात ६८० कोटी रुपयांची उलाढाल आणि १० कोटी रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे.