no images were found
महाराष्ट्र चेंबरतर्फे निर्यात वृद्धीसाठी व्यापारी, उद्योजकांची
आज संयुक्त बैठक : ललित गांधी
कोल्हापूर : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने निर्यात वृद्धी विषयावर व्यापारी आणि उद्योजकांची १६ जानेवारी, २०२४ रोजी (मंगळवारी) संयुक्त बैठक होणार आहे. उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या रामभाई सामाणी सभागृहात दुपारी चार नंतर ही बैठक होईल, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. दुबई येथे ‘महाबीज २०२४” ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई (GMBF) चे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर कोल्हापुरात येत असून ते या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
निर्यातीमुळे महसूल वाढण्यास हातभार लागतो आणि यामुळे गुंतवणुकीच्या विस्तारास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे अधिक नोकऱ्या निर्माण होतात, वेतन वाढते आणि नागरिकांना सक्षम बनते. निर्यात विक्री आणि नफा वाढवू शकते आणि जागतिक बाजारपेठेतील लक्षणीय हिस्सा मिळवण्याची संधी देखील देऊ शकतात. निर्यातीला वेग देण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणालाही मंजूरी दिली आहे. हे धोरण २०२७-२८ पर्यंत राबवले जाणार असून त्यामुळे राज्यात अंदाजे रुपये २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकसित करणे.
तसेच २०३० पर्यंत देशाच्या १ ट्रिलियन डॉलर निर्यातीच्या उद्दीष्टात राज्याचा २२ टक्के सहभाग साध्य करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. या प्रोत्साहनाचा लाभ राज्यातल्या सुमारे ५ हजार उद्योगांना अपेक्षित आहे. तसेच ४० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होऊन राज्याच्या निर्यातीत १४% पर्यंत वाढ होण्यास मदत होईल. निर्यातक्षम उद्योगांना चालना देऊन जिल्हा पातळीवरच निर्यात केंद्र सुरु करण्याचा या धोरणात समावेश आहे. यासह निर्यातवृद्धी बाबत महत्वाचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनीअरींग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (स्मॅक) गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (गोशिमा), मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल अँण्ड हातकणंगले (मॅक), श्री लक्ष्मी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (स्लिमा) या प्रमुख संस्थासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील मान्यवर या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.