no images were found
ब्रॅंडेड कापडी पिशव्यांसाठी पैसे घेण्याच्या दुकानांच्या अनुचित प्रथेचा वंदनाकडून कडाडून विरोध
सोनी सबवरील वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से या लोभस कौटुंबिक मालिकेत मध्यमवर्गीय वागले कुटुंबाला आपल्या दैनंदिन जीवनात कोणकोणत्या लहान-मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याचे चित्रण केलेले असते. अलीकडच्या भागात, राजेशच्या कंपनीत कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा प्रकार चालू असताना राजेश (सुमित राघवन) एक मोठे पाऊल उचलतो आणि आपल्या नोकरीवर पाणी सोडून इंदूरहून परत येतो. आपल्या टीम सदस्यांची नोकरी वाचवण्यासाठी स्वतः राजीनामा देऊन राजेश पुन्हा एकदा आपल्या कनवाळू स्वभावाचा परिचय करून देतो.
आगामी भागांमध्ये, ‘वागले की दुनिया’ समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकण्याची आपली परंपरा चालू ठेवताना दिसणार आहे. मानसिक स्वास्थ्य, ब्रेस्ट कॅन्सरबाबतचे गैरसमज आणि अशा इतर अनेक विषयांना स्पर्श करणारी ही मालिका आता एका सामान्य पण काहीशा दुर्लक्षित विषयाला हात घालणार आहे. वंदना (परिवा प्रणती) एका स्थानिक सुपरमार्केटच्या विरोधात उभी राहते, कारण या सुपरमार्केटमध्ये दुकानाचे ब्रॅंडिंग करणाऱ्या कापडी पिशव्यांसाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जात असतात, ज्याला आपल्या देशात कायद्याने बंदी आहे. या मोहिमेतून सामान्य माणसासमोर येणारी दैनंदिन आव्हाने आणि उघडपणे चर्चा होत नसलेले सामाजिक प्रश्न यांचे चित्रण करण्याची मालिकेची वचनबद्धता दिसून येते. यापुढे उलगडणारे हे कथानक प्रत्येक एपिसोडला रोचक बनवेल आणि प्रेक्षकांना नक्की विचार करण्यास प्रवृत्त करेल.
वंदना वागलेची भूमिका करणारी अभिनेत्री परिवा प्रणती म्हणते, “दैनंदिन जीवनातील समस्यांना स्पर्श करणाऱ्या या मालिकेत काम करणे खरोखर समाधान देणारे आहे. वंदना एक ठाम भूमिका घेते आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना दररोज ज्या समस्येला तोंड द्यावे लागते, त्या समस्येविरुद्ध उभी राहते. आगामी भागांत, ब्रॅंडेड पिशव्यांसाठी ग्राहकांकडून पैसे उकळण्याच्या अनुचित प्रथेविरुद्ध ती आवाज उठवते. आपण सर्व नागरिकांनी एकजूट होऊन या बेकायदेशीर प्रथेचा बिमोड केला पाहिजे. आमच्या या मालिकेत ही विशेष शक्ती आहे की, त्यात सामाजिक समस्या अशा पद्धतीने मांडल्या जातात की, प्रेक्षकांना त्या आपल्या समस्या वाटतात. प्रेक्षकांशी तादात्म्य साधणारी आणि महत्त्वाच्या समस्यांबाबत संभाषणास चालना देणारी व्यक्तिरेखा साकारणे हा मला स्वतःला सशक्त करणारा अनुभव आहे.