
no images were found
खासदार भावना गवळी हसन मुश्रीफ यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपांचे काय झाले, ? या प्रश्नावर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
पिंपरी : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवार गटाचे नेते, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यासह अनेकांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. त्यानंतर मुश्रीफ हे शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये मंत्री झाले. तर, गवळी या शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या. पुढे त्यांच्या चौकशा संथ झाल्याचे दिसते.
पिंपरी-चिंचवडमध्ये किरीट सोमय्या आले असता त्यांना याबाबत विचारले. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, ज्या-ज्या माझ्या तक्रारी झाल्या. त्यामध्ये १०० टक्के तथ्य आढळले, खऱ्या निघाल्या. ३९ घोटाळे मी बाहेर काढले. त्या सगळ्याची चौकशी पुढे झाली. कोणाची मालमत्ता यंत्रणांनी जप्त केली. कुठे चौकशी, गुन्हे दाखल झाले आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रकरण न्यायालयात चालू आहे. मुश्रीफ यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. पुढचा निर्णय न्यायालयाने घेणे अपेक्षित आहे. न्यायालयापर्यंत पोहचविण्याचे माझे काम आहे. न्यायालयात जावून काळा कोट घालून मी उभा राहू शकत नाही. भावना गवळी यांची सव्वा आठ कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित हस्तांतरित विकास हक्क घोटाळ्याबाबत हा माझा विषय नाही म्हणत किरीट सोमय्या यांनी बोलण्याचे टाळले.